Friday, July 19, 2013

मैत्र.




मला आठवतं, मी कॉलेज मध्ये असताना माझ्या ग्रुपमध्ये ५ मैत्रिणी होत्या. मला नेहेमी वाटायचं की “कसं नं?, इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मुलं-मुली आहेत पण तरीही आम्हीच पाच जणी कशा एकत्र आलो?”
माझ्या मैत्रिणी यावर हसायच्या. हिचे “असं कसं नं?” हे प्रश्न फारच गमतीशीर असतात. अगदी अजूनही त्या मला विचारतात, काय गं? तुझं, असं कसं नं? ऐकलं नाही बरेच दिवसात.
पण मला तेव्हा अगदी खरच असा प्रश्न पडायचा. विद्यार्थ्यांची इतकी गर्दी असलेल्या कॉलेजमध्ये नेमक्या आम्ही पाच जणीच कशा एकत्र आलो? किंवा इतर जे ग्रुप बनतात ते ही कसे नेमके तसेच बनतात?
म्हणजे जसा जगाच्या नकाशावर एखादा विमानमार्ग दाखवताना आपण वेगवेगळी  ५ ठिकाणे पाच बिंदूंच्या स्वरुपात एका रेषेने जोडतो. तेव्हा जसा ग्राफ आपल्याला दिसतो तसाच आमच्या मैत्रीचाही दिसेल नाही? म्हणजे कॉलेजमधली सगळी मुलं म्हणजे अगणित बिंदू आणि त्यातले नेमके आम्हा मैत्रिणींचे मैत्रीच्या एका रेषेत  जोडले गेलेले दिसतील. गम्मत म्हणून एक कल्पना मनात येते. देवसुद्धा हे सारे बिंदू पाहत असेल आणि मग स्वतःच काही विचार करून बिंदूंचे वेगवेगळे गट तयार करत असेल. आणि मग त्या गटातल्या माझ्यासारख्या एखादीला वाटत असेल की,”कसं न?, आपणच ५ जणी एकत्र आलो?” असो.
शेजारी राहणारी, एकत्र प्रवास करणारी, कुठल्या तरी अडचणीत मदतीला आल्यामुळे झालेली मैत्री अशा विविध कारणांनी आपण एकत्र येत असतो हे खरंय. पण या कुठल्या का कारणाने आपण ‘विशिष्ट’ जण एकमेकांशी मैत्रीच्या नात्याने बांधले जातो. हे असं एकत्र येणं हे देखील ठरलेलंच असतं बहुधा.  कोणाची मैत्री कोणाशी आणि का होते हे खरंच एक गूढच आहे.
मला आठवतं, मी फ्रेंच भाषा शिकायला जायचे तिथे आम्हा नवशिक्यांचा एक ग्रुप झाला होता. त्यात कॅथोलिक होते, पंजाबी होते. त्यातल्या अनिता नावाच्या पंजाबी मुलीशी माझी जरा जास्त मैत्री झाली.
तिचं एका मुस्लीम मुलावर प्रेम होतं. घरून अर्थात विरोध होता. तिने त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं. तो दुबईला राहायचा. तिथे गेल्यानंतरही तिने माझ्याशी संपर्क ठेवला होता. ती तिथून मला पत्र लिही. मला आठवतं, एका पत्रात तिने मला लिहिलं होतं की तिच्या घरचे तिच्यावर चिडले आहेत त्यामुळे काही संपर्क ठेवून नाहीयेत. तिने तिच्या एका चुलत बहिणीला फोन करून तिला पत्र लिहायला सांग असं मला निरोप दिला. मी ही तो दिला. मग यथावकाश, घरी सगळं आलबेल झालं. ती तिथे खुपच खुश होती. या अनिताशी आता माझा काहीही संपर्क नाही. मला ठाऊक नाही ती अजूनही तिथेच आहे की भारतात परतली आहे आणि तिलाही माझ्याबद्दल काहीच ठाऊक नसणार. या अनिताशीच तेव्हा माझी जास्त मैत्री का झाली आणि आता ती अजिबात का नाहीये याला काहीच उत्तर नाही. कालौघात मैत्रीची वीण सुटली हेच खरं.
नंतर वंदना नावाची माझी फ्रेंचच्या पुढच्या क्लास मधली मैत्रीण होती. तिच्याबरोबर मी रोज तिच्या बाबांच्या जीप मधून वांद्र्याला क्लासला जायचे. क्लास संपल्यानंतर संपर्क तुटला. अनेक वर्षांनी ती मला अचानक पुणे स्टेशन वर भेटली. लग्न होऊन ती आता पुण्याला असते हे कळलं. खरं तर आमची फक्त क्लास पुरती मैत्री होती. कधी मधी तिची आठवण येण्यापलीकडे मला फारसा काही फरक पडला नसता पण तरीही ती मला अचानक भेटावी, ध्यानीमनी नसताना आणि ते ही पुणे स्टेशन वर! पण मग मला जास्त जवळची असलेली अनिता मात्र अशी अचानक कुठे का नाही भेटली अजून?
मी “नकळत सारे घडले” नाटकाच्या दौऱ्यावर लंडन ला गेले होते. तिथे आमच्या ग्रुप ची ज्या हॉटेलात राहायची सोय केली होती त्या हॉटेलात एक मराठी मुलगी काम करत होती...मार्केटिंग विभागात. एकदम चुणचुणीत मुलगी ..नाव सलोमी. एक मराठी ग्रुप इथे राहतोय म्हटल्यावर आम्हाला येऊन भेटली. जमेल तशी मदत करायची. सर्वांशी तिने गोड बोलून ओळख करून घेतली. माझ्या वयाची असल्याने माझी तिच्याशी मैत्री झाली. “पुण्याला आले की तुला फोन करीन नक्की” असं मी तिथून निघताना मला म्हणाली. मग इमेल वरून आम्ही संपर्क ठेवला. पुण्याला आली तेव्हा मला तिने न विसरता फोन केला. आणि माझा मुंबईचा पत्ता आणि फोन नंबर निघताना हरवला असूनही, ३ वर्षांपूर्वी मी सांगितलेल्या बिल्डिंगचं नाव हुडकत ती चक्क माझ्या घरी येऊन धडकली. अजूनही आम्ही नियमित संपर्कात आहोत कारण आता तर फेसबुक मुळे सगळं सोपं झालंय. एका पुण्यातल्या मराठमोळ्या मुलीशी माझी ओळख मात्र झाली सातासमुद्रापार असलेल्या लंडनमध्ये. गेली ७ वर्षे, स्वतःच्या बळावर एकटी लंडन ला राहणारी ही मुलगी, नोकरी करून तिथे पदव्युत्तर शिक्षण घेत होती. ते पूर्ण झाल्यावर नोकरी शोधून अर्थार्जन ही सुरु केलं. शिवाय एकटी सगळं जग फिरणारी ही धडाडीची मुलगी मला आयुष्यात भेटणं माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होतं. तिच्याकडून आयुष्याबद्दल एक सकारात्मक दृष्टीकोन मला मिळाला. आणि म्हणूनच तिची माझी भेट आणि ओळख होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं. काही माणसं काहीतरी शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात येतात नाही?
प्रपंच आणि ४०५ आनंदवन च्या लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, ज्या जपानी महिकारी च्या उपासक आहेत, त्या महिकारीतील एक संकल्पना नेहेमी सांगायच्या  की समजा बस मधून जाताना कोणाच्या शर्टाची बाही जरी आपल्याला चाटून गेली तरी त्याचं आणि आपलं पूर्वजन्मीच काही नं काही connection असतं.
असेलही. कारण खरंच काही वेळा काही व्यक्ती आपल्या आयुष्यात का येतात ते आपल्याला उमगत नाही. कारण त्या आपल्याला त्रासच देऊन जातात..आणि ते ही काहीही संबंध नसताना. याउलट काही व्यक्ती अगदी सहज येऊन आपल्याला त्यांचा परीसस्पर्श देऊन जातात.
काही सुहृद शत्रू ही वागणार नाही असं आपल्याला टोचून जातात तर काही मित्र अगदी रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन आपल्यासाठी जीव टाकतात. हे सगळं आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडलं आहे की नाही?
गेल्या दहा वर्षांत झालेल्या टेक्नोलोजीच्या प्रगतीमुळे हल्ली फेसबुक, स्काईप वरून अक्षरशः हजारो जणांशी कनेक्टेड राहता येतं. मैत्रीच्या जगतातला हा एक मोठा क्रांतिकारी बदल आहे. आपली मैत्री आता वैश्विक पातळीवर गेलीये. साता-समुद्रापार असलेल्या लोकांशी आपण चुटकीसरशी, बसल्या-बसल्या हातातल्या मोबाईलवरून संपर्क ठेवू शकतो. फार वर्षांपूर्वी “पेन-फ्रेंड” नावाची नवी संकल्पना मैत्रीच्या या जगात रुजली होती. तीही कालौघात विसरली गेली. पत्रव्यवहार आता जवळ जवळ संपलाच. फेसबुकमुळे मैत्री सोप्पी झालीये पण त्यामुळे ती सरसकट होऊ लागलीये. म्हणजे आता गूढ रीतीने, अतर्क्य पद्धतीने मैत्र निर्माण होण्यातली गंमत काहीशी कमी झालीये. कारण एकमेकांना शोधणं आता सोपं झालंय. कोण कुठे आहे हे हवं असेल तर टाका फेसबुकवर नाव आणि मिळवा माहिती.
पण दुसऱ्या बाजूने हे ही खरंय की जी अनिता मला गेल्या पंधरा वर्षांत कुठे अचानक भेटली नाही ती फेसबुकवर भेटू शकेल.
नव्या युगातल्या नव्या बदलाशी मैत्री करणे अपरिहार्य आहे हे खरेच.



Thursday, July 11, 2013

घर !




परवा एल्फिन्स्टन पुलावरून येताना समोर एका उंच इमारतीच्या बांधकामाचा सांगाडा तयार होताना दिसत होता. लांबून बघताना एक उंच आयत आणि त्यावर छोटे छोटे रिकामे चौकोन दिसत होते. ही इमारत हळू हळू बांधून पूर्ण होईल. या चौकोनांना खिडक्या लागतील. एकदम चकाचक होऊन राहण्यास अगदी योग्य अशी घरं यात तयार होतील. यथावकाश कुटुंब राहायला येतील आणि इमारत राहती होईल. ही इमारत उभारणारे आणि या कामामुळेच स्वतःला मात्र कायमचं घर नसणारे मजूर इतर कुठेतरी अशीच इमारत बांधत असतील.

एखादी इमारत उभी राहते तेव्हा तिथे कोण कोण राहायला येईल काहीच माहिती नसतं. एकीकडे ही रिकामी, नवी घरं त्यांना आपलंसं करणाऱ्या माणसांची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे अनेक जोडपी, कुटुंब घराच्या शोधात फिरत असतात. माझा एक मित्र त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी योग्य अशा, मोठ्या   घराच्या शोधात गेली २ वर्षं आहे पण मनासारखं, हव्या त्या एरिया मध्ये आवडेल असं घर अजून त्याला मिळालं नाहीये. तशी कथा माझ्या एका मैत्रिणीची. तिला दादर मध्ये हवं तसं घर मिळायला जवळ जवळ ३-४ वर्षं लागली. तोपर्यंत ती ठाण्याला राहायची पण इथे मनासारखं घर मिळेपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता.

काही जणांकडे मनासारखं घर नसतं तर काहीजणांकडे घरच नसतं. घराचं देखील असंच असेल का? म्हणजे घराला देखील त्यात राहणारी माणस आवडत नसतील किंवा काही घरांकडे माणसच येत नसतील. आणि ही कुलुपबंद घरं वर्षानुवर्षे कुठलातरी कुटुंब येऊन नांदण्याची वाट पाहत असतील.
जन्माला येताना आपण एका तयार घरात येतो. त्याला आपलंसं करतो. अनेक वर्षं तिथे राहतो. आपल्या सगळ्या हालचाली ते घर बघत असतं. आपलं मोठं होणं बघत असतं. मग कधीतरी जेव्हा आपण मोठे होतो आणि आपल्याला आपलं स्वतःच घर असावं असं वाटू लागतं तेव्हा आपल्या इतक्या वर्षांच्या घराला देखील वाईट वाटत असेल का?

माझ्या कॉलेज मधल्या मैत्रिणीच्या गोरेगाव मधल्या घरी आम्ही नेहेमी राहायला जायचो. अगदी छोटं, गोड घर होतं ते. अजूनही तिथे गेलं की तिथे आम्ही मैत्रिणींनी केलेली मजा आठवते.
गेली दहा वर्षं ती मैत्रीण शिकागो ला राहत्ये. तिथे तिचं दुमजली, सुंदर घर आहे. तिचं स्वतःच घर.  ते जेव्हा मी प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मला इतकं आवडलं. खरं तर मी नाटकाच्या निमित्ताने जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा सुंदर, सुंदर अनेक घरं पाहिली. पण तरी मला सर्वात आवडलं आणि पुन्हा जावसं वाटेल इतकं आवडलं ते तिचच घर. म्हणजेच घरातल्या माणसांमुळे घर अधिक सुंदर होतं हेच खरं.

माझं आजोळ लोणावळ्याला होतं. तिथे एक टुमदार जुन्या पद्धतीचं आमचं घर होतं. काही वर्षांपूर्वी ते पाडून ती जागा डेव्हलपमेंट साठी दिली आणि तिथे एक तिमजली इमारत उभी राहिली. आमच्या जुन्या घराचा अक्षरशः काही मागमूसही राहिला नाही. त्या घराने वाढवलेली मुलं आणि मुली वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन सुखाने नांदू लागल्या. कुणी दादर ला, कोणी पुण्यात, कोणी गिरगावात तर कोणी ठाण्यात. ते घर मात्र आता राहिलं नाही आणि त्या जागेने, तिथे उभारलेल्या इमारतीमध्ये राहणारी नवी बिऱ्हाडे आता आपलीशी केली असतील. जसं आपल्याला आपलं घर सोडवत नाही तसं घरालाही आपली लोकं जाऊ नयेत असं वाटत असेल नाही का?

माझ्या कॉलेजमधल्याच दुसऱ्या मैत्रिणीचं पुण्यात नवे घर होते. आम्ही सगळ्या जणी त्या वेळी तिथे रहायला गेलो होतो मुंबईहून. खूप मस्त आठवणी आहेत तिथल्या. त्या घराच्या छोट्याशा गच्चीत आम्ही उत्साहाने किती तरी फोटो काढले होते तेव्हा. आता अनेक वर्षानंतर तिचे पुण्यात आणखी एक नवे घर झाले. आत्ताच्याप्रमाणे सजवलेले...सुंदर. पण त्या जुन्या घराविषयी जे प्रेम आणि ओढ वाटते ती वेगळीच.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने तिचा टेरेस असलेला ब्लॉक विकायचा आहे म्हणून सांगितलं. खूप छान आहे घर. मी पाहिलंय. ती म्हणाली की खूप लाभलं ग मला हे घर पण काही कारणांनी ते विकायचं आहे. मी विचार करू लागले की त्या घराचे काय म्हणणे आहे याबद्दल? आता हे घर नव्या कुटुंबाची वाट बघणार. कुठेतरी कोणीतरी अशा घराच्या शोधात असेल. ज्या कोणाला परवडेल तो ते घर अखेरीस घेईल. मग त्या कुटुंबाची नव्या घरातली वाटचाल सुरु होईल तशीच त्या घराचीही या नव्या माणसांबरोबर.

आपल्याला हव्या त्या एरियात असलं तरी तिथलं प्रत्येक घर घेणाऱ्याला आवडतंच असं नाही. पण एखादं घर मात्र अगदी प्रसन्न वाटतं आणि मग त्या ही घराला मिळतो मालक. असंही असेल की बघायला येणारी कुटुंब पाहून एखादं घर आनंदी होत असेल आणि ती सकारात्मक स्पंदनं त्या लोकांना मिळत असतील आणि अशा रीतीने एका रिकाम्या घराला सुयोग्य मालक मिळत असेल.
घरातल्या माणसांमुळे घराला घरपण येतं. एका नीटनेटक्या, रिकाम्या चौकटीला जिवंतपणा येतो. पण कुठलं घर कोण सजवणार हे मात्र एक गूढ असतं नाही?











Friday, July 5, 2013

“लो पेकाडोस द मी पाद्र” (द सीन्स ऑफ माय फादर )!


 
कोलंबियाचा कुप्रसिद्ध ड्रग माफिया “पाब्लो एस्कोबार” च्या आयुष्याची सुरसकथा गेल्या वेळी इथे लिहावीशी वाटली ती एका वेगळ्याच कारणामुळे. ३-४ वर्षांपूर्वी, एका इंग्रजी वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. एका फिल्मच्या रिलीजची. त्यामुळेच मला पाब्लो एस्कोबारबद्दलची माहिती मिळवावीशी वाटली.

......तर, एस्कोबारला कोलंबियन पोलिसांनी मारल्यानंतर, त्याचं कुटुंब – पत्नी विक्टोरिया, मुलगा जुआन आणि मुलगी मेनुएला हे कोलंबिआतून पळून गेले. पेरू, इक्वाडोर, मोझाम्बिक, साउथ आफ्रिका असे देशोदेशी फिरत राहिले. त्यांचा कौटुंबिक इतिहास पाहता त्यांना कुठल्याही देशांत थारा मिळणं शक्यच नव्हतं. युद्धाने ग्रासलेल्या मोझाम्बिकमध्ये हलाखीत राहताना, तरुण जुआन एस्कोबार डिप्रेशन मध्ये गेला आणि त्या अवस्थेत आत्महत्या करण्याचाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. पुढे अर्जेंटिना मधील ब्युनोर्स आयर्स मध्ये त्यांना आश्रय मिळाला खरा पण तिथेही त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्याची आई, विक्टोरियाने “मारिया इसाबेल सांतोस” हे नवीन नाव घेऊन रियल इस्टेटचा व्यवसाय सुरु केला. परंतु तिचं पाब्लोशी पूर्वी असलेल नातं फार काळ लपून राहू शकलं नाही. काळा पैसा वापरल्याच्या आरोपावरून तिला अठरा महिने तुरुंगात डांबण्यात आलं. जुआनलाही काही दिवस तुरुंगवास झाला. मेनुएलावर, ती शिकत असलेल्या विद्यापीठातून बहिष्कार टाकण्यात आला. तिचं पाब्लोशी असलेलं नातं कळल्यामुळेच इतर पालकांनी तिला विद्यापीठातून काढून टाकण्याची मागणी केली होती. साधारण सात वर्षांनी या कुटुंबावरचे सगळे आरोप मागे घेण्यात आले. जुआन एस्कोबारने “साबास्तीएन मारोकन” हे नवीन नाव धारण केलं. आपल्या कोलंबियन मैत्रिणीशी त्याने लग्न केलं. आता आर्किटेक्ट-इंडस्ट्रीयल डिझायनर म्हणून तो काम करतो आणि एक सर्व सामान्य जीवन जगत आहे.

मी इंग्रजी वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली होती की पाब्लो एस्कोबारच्या मुलाची एक फिल्म प्रदर्शित होत आहे -“ लो पेकाडोस द मी पाद्र” म्हणजेच “द सीन्स ऑफ माय फादर"!

जुआनसाठी त्याचे वडील हे नक्कीच “आदर्श माणूस” नव्हते. परंतु वडील म्हणून त्यांनी जुआनवर प्रेम केलं. “तुला आयुष्यात जे काही करावसं वाटत असेल ते करण्यासाठी लागणारं सगळं काही तुला मी उपलब्ध करून देईन.” हे आश्वासन त्यांनी दिलं. आपल्या व्यवसायापासून कुटुंबाला दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु सरतेशेवटी तो एक क्रूरकर्माच होता आणि त्याचं पाप फार मोठं होतं.
आज सामान्य जीवन जगणाऱ्या जुआन उर्फ साबास्तीएनला मात्र वडीलांचा हा काळा वारसा नकोय.
“कोलंबिया मध्ये वर्षानुवर्षं, पिढ्यानपिढ्या हेवेदावे जपले जातात. एकमेकांचे सूड घेतले जातात. ही वाईट परंपरा आता बंद झाली पाहिजे. आणि मला त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.” या अतिशय सकारात्मक हेतूने साबास्तीएनने एक फिल्म तयार करवून घेतली. "लो पेकाडोस द मी पाद्र” हीच ती फिल्म. एका अर्जेंटिनाच्या दिग्दर्शकाने ती बनवली आणि ती अर्जेंटिना मध्ये प्रदर्शितही झाली.
“आमच्या पालकांचा वारसा आम्ही पुढे नेणार नाही. हा दुष्टावा इथेच संपला पाहिजे.” असा संदेश त्याने कोलंबियन जनतेला दिला आणि त्याच्या वडिलांनी हत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची, त्यांना प्रत्यक्ष भेटून माफी मागितली. पाब्लोने हत्या केलेले, प्रेसिडेंट पदाचे उमेदवार लुईस कार्लोस गालान यांची तीन मुले आणि कोलंबियाचे न्यायमंत्री रोड्रीगो लारा यांच्या मुलाला भेटताना मात्र त्याच्या मनावर खूप दडपण आलं.
“ड्रगसारख्या गोष्टींच्या व्यापाराचे घातक परिणाम लोकांना कळले पाहिजेत. मी पाब्लो एस्कोबारचा मुलगा आहे, माझ्या वडिलांसारखे बनू नका.” हा संदेश एका ३२ वर्षीय मुलाला त्याच्या देशातील जनतेला द्यावासा वाटतो आणि मोठ्या धैर्याने तो ते करतोही. आपल्या वडिलांनी चुकीच्या कामासाठी केलेल्या निष्पाप लोकांच्या हत्यांची जबाबदारी एका तरुण मुलाला वाटते ही किती मोठी गोष्ट आहे.
अत्यंत धोकादायक परिस्थितीत बालपण घालवलेल्या, वडिलांच्या काळ्या कृत्यांमुळे जीवन झाकोळलेल्या एका मुलासाठी, अनेक संकटांमधून बाहेर येऊन, स्वतःचं “सामान्य” जीवन निर्माण करणं हेच मुळात एक आव्हान आहे. अशाच परिस्थितीतला दुसरा एखादा मुलगा भरकटू शकला असता. स्वतःला सावरू शकला नसता. पण जुआन मात्र सावरला. त्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपलं आयुष्य रुळावर आणलं. 
आपल्या वडिलांचे, त्यांच्या कर्तुत्वाचे कौतुक करणारी, त्यांचा वारसा अभिमानाने पुढे नेणारी हजारो मुलं आपण पाहिली असतील पण “माझ्या वडिलांसारखं बनू नका” असा संदेश देणारी किती आहेत? आणि हे असं म्हणणं, पोटच्या पोरासाठी सोपं आहे? पण साबास्तीएन मारोकन उर्फ जुआन पाब्लो एस्कोबारने ते साध्य केलं आणि ते नुसतं कौतुकास्पद नाही तर गौरवास्पद आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच मानवी मनाचा हा एक वेगळा गूढ पैलू इथे तुमच्यासमोर मांडावासा वाटला.
आपले पालक निवडणं आपल्या हातात नसतं. आपलं बालपण सुसंस्कारित असणं हेही आपल्या हातात नाही. पण आपलं आयुष्य आपल्या हातात असतं आणि सकारात्मक राहणं हेही. मनाची ताकद वाढवणं आणि परिस्थितीला तोंड देणं, स्वतःला सावरणं हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शक्य आहे हे जुआनने दाखवून दिलं.  
नुकतीच जिया खानने केलेल्या आत्महत्येची बातमी पचवायची वेळ आपल्यावर आली. अर्थात, ही काही अशी पहिलीच बातमी नव्हे. बऱ्यापैकी कौटुंबिक परिस्थिती असलेल्या, बऱ्यापैकी सुरळीत आयुष्य असलेल्या या मुली एका कमकुवत क्षणी आपलं आयुष्य संपवतात. एक असामान्य आयुष्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनाला इतकं कमजोर कसं करून टाकते?
या पार्श्वभूमीवरदेखील, साध्या माणसासारखं साधं आयुष्य जगता यावं यासाठी आपल्या काळ्या भूतकाळाशी जुआन एस्कोबारने दिलेली लढाई, सकारात्मकतेच्या दिशेने उचललेलं धाडसी पाऊल आणि त्याच्या मनाचा कणखरपणा या गोष्टी अधिकच उठून दिसतात.



Saturday, June 29, 2013

पाब्लो एस्कोबार.

"सोळा वर्षांच्या आपल्या मुलाशी फोनवर केवळ काही सेकंद जास्त बोलणं त्याला चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी माग काढून त्याला आपल्या बंदुकीचं लक्ष्य बनवलं. त्याचा  मुलगा, मुलगी, आणि बायको जीवाच्या भीतीने पळाली. कुठल्याच देशात त्यांना थारा  मिळत नव्हता. इक़्वेडोर, पेरू, ब्राझील, साउथ आफ्रिका आणि मोसाम्बिक अशा ठिकाणी रहात रहात पर्यटक म्हणून त्यांनी अर्जेंटिनामधे प्रवेश मिळवला आणि ब्युनोस आयर्स येथे अखेर त्यांना आश्रय मिळाला. तिथे नावं बदलून ते सामान्य जीवन जगू लागले. "
ही कुठल्याही सिनेमाची कथा नसून एक सत्यकथा आहे. कोलंबियामधील अत्यंत क्रूर, अट्टल गुन्हेगार असणाऱ्या ड्रग माफिया "पाब्लो एस्कोबार" आणि त्याच्या निष्पाप कुटुंबाची ही खरीखुरी चित्तरकथा.
कोलंबियात १९८० च्या दशकात या ड्रग माफियाचा प्रचंड दरारा होता. पाब्लो एस्कोबारला लहानपणी खरं तर कोलंबियाचा प्रेसिडेंट बनायचं होतं. प्रेसिडेंट बनू शकला नाही पण अत्यंत चुकीच्या मार्गाने तो त्या देशावर जवळ जवळ हुकुमत गाजवणारा क्रूरकर्मा मात्र बनला. पेरू आणि बोलीव्हियातून कोको पेस्ट आणून, तिच्यावर प्रक्रिया करून ती अमेरिकेत विकणं हा धंदा सुरु करून पुढे त्याने ड्रग विकणारी सगळ्यात धोकादायक अशी टोळी निर्माण केली. या टोळीने कोलंबियावर अक्षरशः वर्चस्व गाजवलं.
 "प्लाटा ओ प्लोम्बो" म्हणजे शब्दशः "चांदी किंवा शिसे " या सूत्राने ही टोळी काम करे. म्हणजे कोलंबियातील कोणीही राजकारणी, जज किंवा पोलीस जर एस्कोबारच्या विरोधात जाऊ लागला तर त्याला प्रथम लाच देऊ पहायची नाहीतर सरळ मारून टाकायचं. अशा रीतीने कोलंबियाच्या प्रेसिडेंटपदाचा उमेदवार लुईस कार्लोस गालान आणि कोलंबियाचे न्यायमंत्री रोड्रिगो लारा यांची हत्या एस्कोबारने करवली. त्याच्या "मेडेलिन कार्टेल(टोळी)" ने अशा रीतीने हैदोस घातला होता. अर्थात तो अत्यंत हुशार गुन्हेगार होता. मेडेलिन शहरासाठी त्याने भरपूर धनदान केलं. चर्चेस बांधली. शाळा, उदयाने शिवाय गरिबांसाठी घरेही बांधली. त्यामुळे मेडेलिन जनतेच्या मनात त्याने "दाता" म्हणून घर केलं. त्याची स्वतःची अनेक मोठी घरं होती, विमानं होती. चक्क एक प्राणी संग्रहालयदेखील होतं. ऐंशीच्या दशकात एस्कोबार हा जगातल्या अत्यंत प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होता. आणि जगातला सातवा "श्रीमंत"!

अमेरिकन सरकारला एस्कोबार ड्रगच्या व्यापाराच्या आरोपाखाली हवा होता, परंतु कोलंबियात त्याची प्रचंड दहशत, त्यामुळे कोलंबियन सरकार आणि एस्कोबारच्या वकिलांनी मिळून एक मधला मार्ग काढला आणि त्याला शरण येण्यास सांगितले. त्याला ५ वर्षांचा कारावास देण्यात आला. या बदल्यात त्याने स्वतःच स्वतःसाठी तुरुंग बांधावा. असे केल्यास त्याला अमेरिकेच्या हवाली देण्यात येणार नाही असा तो मधला मार्ग. मग काय? तुरुंगाच्या नावाखाली त्याने "Le Cathedral"  नावाचा मोठ्ठा किल्ला बांधला ज्यात जाकुझी, धबधबा, बार आणि चक्क सॉकरचं मैदान होतं. शिवाय इतर मालमत्ता, पैसे होतेच. तुरुंगातही त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या. आपल्याशी गद्दारी केलेल्या आपल्याच टोळीतील अनेकांना त्याने या तुरुंगात आणून मारलं. मग मात्र त्याला साध्या तुरुंगात हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला. ते कळल्यावर एस्कोबार पळाला आणि लपून राहू लागला. शेवटी १९९३ मधे मेडेलिन पोलिसांनी त्याला मारण्यात यश मिळवलं. अशी ही या क्रूरकर्म्याची कथा..

 पाब्लोचं वादळी आयुष्य वाचताना मनात विचार आला की आपण सामान्य माणसे आपलं साधारण आयुष्य जगताना, त्यात कितपत चांगले किंवा वाईट योग येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी पत्रिका बनवतो. ज्योतिषांना दाखवतो. माणूस जन्मल्या-जन्मल्याच तो पुढे कोण आणि कसा होणार आहे हे खरंच ठरलेलं असतं का? "विधिलिखित" असं ज्याला म्हणतात. जन्मवेळेवरून केलेल्या पत्रिकेच्या अभ्यासावरून ती व्यक्ती पुढे कोण होणार आहे हे कळत असेल तर पाब्लो एस्कोबार किंवा त्याच्यासारखे अन्य हिंस्त्र मानव कुठलं नशीब घेऊन जन्माला येतात? आणि जर आधीच हे भविष्य कळणार असेल तर मग अशी माणसे घडण्यापासून थांबवता आली पाहिजेत, नाही का? शिवाय या माणसांच्या हातून मारलं जाण्याचं कमनशीब घेऊन जन्माला आलेल्या माणसांची पत्रिका नेमकं  काय सूचित करत असेल? माझ्यासाठी हा नेहेमीच एक गूढ विषय असणार आहे.

पाब्लो एस्कोबार हा अभिमान वाटेल असा "वडील" नव्हता. जुआन आणि मन्युएला या त्याच्या दोन मुलांनी त्यापायी कसं आयुष्य घालवलं असेल? अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्समधे ते सध्या सर्वसामान्य आयुष्य जगतायत पण हा भयानक इतिहास ते पुसू शकले का? त्याबद्दल पुढील लेखात...

Wednesday, June 19, 2013

माझा खेळ मांडू दे.....!


मनी आणि टिनी “साप-शिडी” खेळतायत.
“याहू, मला शिडी मिळाली. मी ९६ वर आले.. आता फक्त ४ पडले की मी जिंकले...” मनी खुश होऊन म्हणते.
टिनी बिचारी खूप मागे पडलीये. मनी अगदी विजयाच्या जवळ आलीये हे पाहून तिला जरा वाईट वाटतंय पण करणार काय? ती गुपचूप दान टाकते. चार घरं पुढे जाते. अरेरे, अगदी एकाने शिडी चुकली. जाऊदे. आता काय, मनी जिंकणार!
मनी ने उत्सुकतेने दान टाकलं. “४ पडूदेत, ४ पडूदेत” मनाशी धावा चालू होता. शेवटी धीर एकवटून तिने दान टाकलं. आणि बघते तर काय? २ पडले.
“अरे देवा, ९८ वर एक भला मोठा साप. गिळून टाकलं त्याने मनी ला. एकदम खाली दुसऱ्या घरात पाठवलं तिला.  मनी जिंकता जिंकता राहिली. आता काय, २ म्हणजे खेळ पुन्हा पहिल्यापासून सुरु केल्यासारखं आहे. पण इलाज नाही. मनी खट्टू झाली.
मघाशी मागे असलेली टिनी त्यामुळे एकदम पुढे गेली. अर्थात तिलादेखील कुठे माहित्ये की पुढे काय होणार? ती जिंकणार की मनी पुन्हा पुढे जाणार? हीच तर या खेळाची गम्मत आहे. काहीच सांगता येत नाही आधी, पुढे काय होणार ते!
एका मैत्रिणीच्या घरी सापशिडीचा खेळ एका कापडी पटावर खूप अभिनव पद्धतीने तयार केलेला मी पाहिला. गंमत म्हणून आम्ही दोघी तो खेळू लागलो. मोठेपणी खेळताना, इतक्या वर्षांनी अचानक मला जाणवलं की या खेळाचं सूत्र “आयुष्यातली अनिश्चितता” याच खऱ्या आयुष्यातल्या गूढ बाबीवर आधारलेलं आहे. पटावरच्या शिड्या म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या संधी आणि त्यामुळे होणारी आपली प्रगती तर साप म्हणजे अधोगतीकडे नेणाऱ्या गोष्टी किंवा घटना जसं अपघात, लबाडी, खोटेपणा, फसवणूक इत्यादी.
म्हणजे, आपण आपलं दान टाकत रहायचं आणि एक एक घर पुढे जात रहायचं. साप आणि शिड्या दिसत तर असतात पण त्या मिळतील की नाही हे आपल्या हातात नसतं. कारण दान टाकणं जरी हातात असलं, तरी नेमका हवा तोच आकडा येईल कशावरून?
हा खेळ ज्या कोणी शोधून काढला त्याने हाच विचार केला असेल का? या कुतूहलापोटी
या खेळाचा इतिहास शोधायचा प्रयत्न केल्यावर कळलं की या खेळाचा उगम भारतातलाच. “मोक्ष पतामू” या नावाने हा खेळ प्राचीन भारतात खेळला जाई. त्या ही आधी, १६व्या शतकात, हा मूळ जैन खेळ “लीला” या नावाने ओळखला जाई. आपल्या दैनंदिन आयुष्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या खेळामागच्या हिंदू विचारसरणीमुळे प्रभावित होऊन हा खेळ इंग्लंडमध्ये एका वेगळ्या प्रकारे तयार केला गेला. 
“मोक्ष पतामू” या नावाने हा खेळ बहुदा भारतीय अध्यात्मिक गुरूंनी तयार केला तो लहान मुलांना चांगल्या कृतींच महत्त्व पटवण्यासाठी. शिड्या म्हणजे विश्वास, खरेपणा, उदारपणा यासारख्या गुणांचं प्रतिक तर साप म्हणजे चोरी, खून, राग, हाव किंवा लालसा यांसारखे वाईट गुण! या खेळाचा उद्देश म्हणजे सद्गुणांचा वापर करून दुर्गुणांवर विजय मिळवून मोक्षप्राप्ती करणे हा असे. चांगल्या वागणुकीमुळे मोक्ष मिळेल तर वाईट वागल्यास किडामुंगीचा जन्म मिळेल. शिवाय शिड्यांची संख्या सापांपेक्षा कमी ठेवून, खऱ्या आयुष्यात, सद्वर्तनाचा मार्ग हा पापाच्या मार्गापेक्षा खूप खडतर आहे हेच सुचवायचं आहे.
पहा नं, सापशिडी सारख्या साध्या खेळाच्या निर्मितीमागे मनोरंजनापलीकडे असा काही उद्देश असेल असं आपल्याला वाटतं तरी का?
आता दुसरा खेळ घ्या. पत्त्यांचा...”भिकार-सावकार”. या खेळात देखील तेच सूत्र.
दोघांनी दोन गठ्ठे करून पत्ते वाटून घ्यायचे. ते उलटे ठेवायचे आणि एक एक पान सुलटत जायचं. कुठल्या रंगाचं पान येईल ते आपल्याला माहित नसतं. नशिबानेच तुम्ही त्यात भिकारी किवा सावकार होता. बरे, या खेळाला काही बाकी नियम नाहीत त्यामुळे लहान मुलांना आधी हाच खेळ शिकवला जातो. नियमांची क्लिष्टता त्यांना कळणार नाही म्हणून मग हा सोपा खेळ. नुसतं आपलं पान सुलट करत जायचं, पुढे काय होईल ते होईल. आता हेच आपल्या आयुष्याचही गमक नाहीये का? आपण आपलं काम करत जायचं, जिंकण्यासाठीच प्रयत्न करायचे पण अंतिम निकाल आपल्या हाती नाही. आहे की नाही गंमत?
या दोनच खेळांविषयी मी लिहिण्याचं कारण म्हणजे हे दोन्ही खेळ नशिबावर अवलंबून खेळावे लागतात. त्यांना काही विशेष नियमावली नाही आणि कोणती “strategy” ही नाही. आणि हेच दोन खेळ सर्वात आधी आपण शिकतो आणि खेळतो.
हे खेळ ज्यांनी कोणी तयार केले त्यांनी लहानपणीच मुलांना “आयुष्यातल्या जुगाराचे” बाळकडू दिल्यासारखं आहे नाही? म्हणजे असं मला वाटतं. फक्त ते समजण्या इतकी प्रगल्भता मुलांमध्ये नसते. या खेळांमधून इतक्या लहान वयातच आपल्याला आपल्या पुढील आयुष्याबद्दल थोडी कल्पना मिळते. किंवा “आयुष्य म्हणजे काय” याची एक झलक या खेळांमधून मिळते असं म्हटलं तर ते अधिक योग्य होईल. मी सुरुवातीला लिहिलेला किस्सा आपल्या लहानपणी आपण प्रत्येकाने अनुभवला आहे की नाही?
खरं तर आपल्या आयुष्याला अजाणतेपणी सुरुवात करताना, लहान मुलांना हे असंच आपलं आयुष्य असतं हे कळलं तर किती छान होईल. म्हणजे ती लहानपणीच अगदी तय्यार होतील. आयुष्यातल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी पचवण्यासाठी. पण तसं होत नाही. कारण जसजसे आपण मोठे होतो, अनुभव घेतो, तसतसं आपल्याला आयुष्याचा अर्थ उलगडत जातो. पण म्हणतात नं, कुठल्याही गोष्टीला short cut नसतोच कधी.
मोठेपणी आपण हे खेळ विसरूनही गेलेलो असतो. मग पुन्हा ते खेळ येतात आपल्या मुलांच्या निमित्ताने. तोपर्यंत आपण त्यातल्या बऱ्याचशा शिड्या चढलेल्या असतात आणि अनेक सापही पाहिलेले असतात. त्यामुळे पुढच्या आयुष्याची कल्पना नसलेल्या निरागस मुलांइतक्या उत्साहाने आपण तो खेळ मोठेपणी नाही खेळू शकत.
अगदी कळायला लागतानाच जे लहानांना खेळांमधून अप्रत्यक्षपणे शिकवलं जातं ते समजून घेण्याची त्या वयात त्यांची कुवत नसते. आणि जेव्हा ती कुवत येते, तोपर्यंत ते बालपण संपलेलं असतं. ती प्रगल्भता येण्यासारखी आयुष्यातली ही अनेक वर्ष घालावावीच लागतात. म्हणजे जे गमक लहानपणीच कळलं तर आपलं आयुष्य खूप समजून जगता येईल असं वाटतं, ते खऱ्या अर्थाने कळायला आपल्याला मोठंच व्हावं लागतं.

(नवशक्ती या वर्तमानपत्रासाठी मी "गूढनवल" हे सदर लिहीत असे. त्यातला हा एक लेख)