Friday, July 5, 2013

“लो पेकाडोस द मी पाद्र” (द सीन्स ऑफ माय फादर )!


 
कोलंबियाचा कुप्रसिद्ध ड्रग माफिया “पाब्लो एस्कोबार” च्या आयुष्याची सुरसकथा गेल्या वेळी इथे लिहावीशी वाटली ती एका वेगळ्याच कारणामुळे. ३-४ वर्षांपूर्वी, एका इंग्रजी वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. एका फिल्मच्या रिलीजची. त्यामुळेच मला पाब्लो एस्कोबारबद्दलची माहिती मिळवावीशी वाटली.

......तर, एस्कोबारला कोलंबियन पोलिसांनी मारल्यानंतर, त्याचं कुटुंब – पत्नी विक्टोरिया, मुलगा जुआन आणि मुलगी मेनुएला हे कोलंबिआतून पळून गेले. पेरू, इक्वाडोर, मोझाम्बिक, साउथ आफ्रिका असे देशोदेशी फिरत राहिले. त्यांचा कौटुंबिक इतिहास पाहता त्यांना कुठल्याही देशांत थारा मिळणं शक्यच नव्हतं. युद्धाने ग्रासलेल्या मोझाम्बिकमध्ये हलाखीत राहताना, तरुण जुआन एस्कोबार डिप्रेशन मध्ये गेला आणि त्या अवस्थेत आत्महत्या करण्याचाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. पुढे अर्जेंटिना मधील ब्युनोर्स आयर्स मध्ये त्यांना आश्रय मिळाला खरा पण तिथेही त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्याची आई, विक्टोरियाने “मारिया इसाबेल सांतोस” हे नवीन नाव घेऊन रियल इस्टेटचा व्यवसाय सुरु केला. परंतु तिचं पाब्लोशी पूर्वी असलेल नातं फार काळ लपून राहू शकलं नाही. काळा पैसा वापरल्याच्या आरोपावरून तिला अठरा महिने तुरुंगात डांबण्यात आलं. जुआनलाही काही दिवस तुरुंगवास झाला. मेनुएलावर, ती शिकत असलेल्या विद्यापीठातून बहिष्कार टाकण्यात आला. तिचं पाब्लोशी असलेलं नातं कळल्यामुळेच इतर पालकांनी तिला विद्यापीठातून काढून टाकण्याची मागणी केली होती. साधारण सात वर्षांनी या कुटुंबावरचे सगळे आरोप मागे घेण्यात आले. जुआन एस्कोबारने “साबास्तीएन मारोकन” हे नवीन नाव धारण केलं. आपल्या कोलंबियन मैत्रिणीशी त्याने लग्न केलं. आता आर्किटेक्ट-इंडस्ट्रीयल डिझायनर म्हणून तो काम करतो आणि एक सर्व सामान्य जीवन जगत आहे.

मी इंग्रजी वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली होती की पाब्लो एस्कोबारच्या मुलाची एक फिल्म प्रदर्शित होत आहे -“ लो पेकाडोस द मी पाद्र” म्हणजेच “द सीन्स ऑफ माय फादर"!

जुआनसाठी त्याचे वडील हे नक्कीच “आदर्श माणूस” नव्हते. परंतु वडील म्हणून त्यांनी जुआनवर प्रेम केलं. “तुला आयुष्यात जे काही करावसं वाटत असेल ते करण्यासाठी लागणारं सगळं काही तुला मी उपलब्ध करून देईन.” हे आश्वासन त्यांनी दिलं. आपल्या व्यवसायापासून कुटुंबाला दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु सरतेशेवटी तो एक क्रूरकर्माच होता आणि त्याचं पाप फार मोठं होतं.
आज सामान्य जीवन जगणाऱ्या जुआन उर्फ साबास्तीएनला मात्र वडीलांचा हा काळा वारसा नकोय.
“कोलंबिया मध्ये वर्षानुवर्षं, पिढ्यानपिढ्या हेवेदावे जपले जातात. एकमेकांचे सूड घेतले जातात. ही वाईट परंपरा आता बंद झाली पाहिजे. आणि मला त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.” या अतिशय सकारात्मक हेतूने साबास्तीएनने एक फिल्म तयार करवून घेतली. "लो पेकाडोस द मी पाद्र” हीच ती फिल्म. एका अर्जेंटिनाच्या दिग्दर्शकाने ती बनवली आणि ती अर्जेंटिना मध्ये प्रदर्शितही झाली.
“आमच्या पालकांचा वारसा आम्ही पुढे नेणार नाही. हा दुष्टावा इथेच संपला पाहिजे.” असा संदेश त्याने कोलंबियन जनतेला दिला आणि त्याच्या वडिलांनी हत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची, त्यांना प्रत्यक्ष भेटून माफी मागितली. पाब्लोने हत्या केलेले, प्रेसिडेंट पदाचे उमेदवार लुईस कार्लोस गालान यांची तीन मुले आणि कोलंबियाचे न्यायमंत्री रोड्रीगो लारा यांच्या मुलाला भेटताना मात्र त्याच्या मनावर खूप दडपण आलं.
“ड्रगसारख्या गोष्टींच्या व्यापाराचे घातक परिणाम लोकांना कळले पाहिजेत. मी पाब्लो एस्कोबारचा मुलगा आहे, माझ्या वडिलांसारखे बनू नका.” हा संदेश एका ३२ वर्षीय मुलाला त्याच्या देशातील जनतेला द्यावासा वाटतो आणि मोठ्या धैर्याने तो ते करतोही. आपल्या वडिलांनी चुकीच्या कामासाठी केलेल्या निष्पाप लोकांच्या हत्यांची जबाबदारी एका तरुण मुलाला वाटते ही किती मोठी गोष्ट आहे.
अत्यंत धोकादायक परिस्थितीत बालपण घालवलेल्या, वडिलांच्या काळ्या कृत्यांमुळे जीवन झाकोळलेल्या एका मुलासाठी, अनेक संकटांमधून बाहेर येऊन, स्वतःचं “सामान्य” जीवन निर्माण करणं हेच मुळात एक आव्हान आहे. अशाच परिस्थितीतला दुसरा एखादा मुलगा भरकटू शकला असता. स्वतःला सावरू शकला नसता. पण जुआन मात्र सावरला. त्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपलं आयुष्य रुळावर आणलं. 
आपल्या वडिलांचे, त्यांच्या कर्तुत्वाचे कौतुक करणारी, त्यांचा वारसा अभिमानाने पुढे नेणारी हजारो मुलं आपण पाहिली असतील पण “माझ्या वडिलांसारखं बनू नका” असा संदेश देणारी किती आहेत? आणि हे असं म्हणणं, पोटच्या पोरासाठी सोपं आहे? पण साबास्तीएन मारोकन उर्फ जुआन पाब्लो एस्कोबारने ते साध्य केलं आणि ते नुसतं कौतुकास्पद नाही तर गौरवास्पद आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच मानवी मनाचा हा एक वेगळा गूढ पैलू इथे तुमच्यासमोर मांडावासा वाटला.
आपले पालक निवडणं आपल्या हातात नसतं. आपलं बालपण सुसंस्कारित असणं हेही आपल्या हातात नाही. पण आपलं आयुष्य आपल्या हातात असतं आणि सकारात्मक राहणं हेही. मनाची ताकद वाढवणं आणि परिस्थितीला तोंड देणं, स्वतःला सावरणं हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शक्य आहे हे जुआनने दाखवून दिलं.  
नुकतीच जिया खानने केलेल्या आत्महत्येची बातमी पचवायची वेळ आपल्यावर आली. अर्थात, ही काही अशी पहिलीच बातमी नव्हे. बऱ्यापैकी कौटुंबिक परिस्थिती असलेल्या, बऱ्यापैकी सुरळीत आयुष्य असलेल्या या मुली एका कमकुवत क्षणी आपलं आयुष्य संपवतात. एक असामान्य आयुष्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनाला इतकं कमजोर कसं करून टाकते?
या पार्श्वभूमीवरदेखील, साध्या माणसासारखं साधं आयुष्य जगता यावं यासाठी आपल्या काळ्या भूतकाळाशी जुआन एस्कोबारने दिलेली लढाई, सकारात्मकतेच्या दिशेने उचललेलं धाडसी पाऊल आणि त्याच्या मनाचा कणखरपणा या गोष्टी अधिकच उठून दिसतात.



No comments:

Post a Comment

आपले मत जरूर मांडा.... :-)