Thursday, July 11, 2013

घर !




परवा एल्फिन्स्टन पुलावरून येताना समोर एका उंच इमारतीच्या बांधकामाचा सांगाडा तयार होताना दिसत होता. लांबून बघताना एक उंच आयत आणि त्यावर छोटे छोटे रिकामे चौकोन दिसत होते. ही इमारत हळू हळू बांधून पूर्ण होईल. या चौकोनांना खिडक्या लागतील. एकदम चकाचक होऊन राहण्यास अगदी योग्य अशी घरं यात तयार होतील. यथावकाश कुटुंब राहायला येतील आणि इमारत राहती होईल. ही इमारत उभारणारे आणि या कामामुळेच स्वतःला मात्र कायमचं घर नसणारे मजूर इतर कुठेतरी अशीच इमारत बांधत असतील.

एखादी इमारत उभी राहते तेव्हा तिथे कोण कोण राहायला येईल काहीच माहिती नसतं. एकीकडे ही रिकामी, नवी घरं त्यांना आपलंसं करणाऱ्या माणसांची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे अनेक जोडपी, कुटुंब घराच्या शोधात फिरत असतात. माझा एक मित्र त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी योग्य अशा, मोठ्या   घराच्या शोधात गेली २ वर्षं आहे पण मनासारखं, हव्या त्या एरिया मध्ये आवडेल असं घर अजून त्याला मिळालं नाहीये. तशी कथा माझ्या एका मैत्रिणीची. तिला दादर मध्ये हवं तसं घर मिळायला जवळ जवळ ३-४ वर्षं लागली. तोपर्यंत ती ठाण्याला राहायची पण इथे मनासारखं घर मिळेपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता.

काही जणांकडे मनासारखं घर नसतं तर काहीजणांकडे घरच नसतं. घराचं देखील असंच असेल का? म्हणजे घराला देखील त्यात राहणारी माणस आवडत नसतील किंवा काही घरांकडे माणसच येत नसतील. आणि ही कुलुपबंद घरं वर्षानुवर्षे कुठलातरी कुटुंब येऊन नांदण्याची वाट पाहत असतील.
जन्माला येताना आपण एका तयार घरात येतो. त्याला आपलंसं करतो. अनेक वर्षं तिथे राहतो. आपल्या सगळ्या हालचाली ते घर बघत असतं. आपलं मोठं होणं बघत असतं. मग कधीतरी जेव्हा आपण मोठे होतो आणि आपल्याला आपलं स्वतःच घर असावं असं वाटू लागतं तेव्हा आपल्या इतक्या वर्षांच्या घराला देखील वाईट वाटत असेल का?

माझ्या कॉलेज मधल्या मैत्रिणीच्या गोरेगाव मधल्या घरी आम्ही नेहेमी राहायला जायचो. अगदी छोटं, गोड घर होतं ते. अजूनही तिथे गेलं की तिथे आम्ही मैत्रिणींनी केलेली मजा आठवते.
गेली दहा वर्षं ती मैत्रीण शिकागो ला राहत्ये. तिथे तिचं दुमजली, सुंदर घर आहे. तिचं स्वतःच घर.  ते जेव्हा मी प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मला इतकं आवडलं. खरं तर मी नाटकाच्या निमित्ताने जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा सुंदर, सुंदर अनेक घरं पाहिली. पण तरी मला सर्वात आवडलं आणि पुन्हा जावसं वाटेल इतकं आवडलं ते तिचच घर. म्हणजेच घरातल्या माणसांमुळे घर अधिक सुंदर होतं हेच खरं.

माझं आजोळ लोणावळ्याला होतं. तिथे एक टुमदार जुन्या पद्धतीचं आमचं घर होतं. काही वर्षांपूर्वी ते पाडून ती जागा डेव्हलपमेंट साठी दिली आणि तिथे एक तिमजली इमारत उभी राहिली. आमच्या जुन्या घराचा अक्षरशः काही मागमूसही राहिला नाही. त्या घराने वाढवलेली मुलं आणि मुली वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन सुखाने नांदू लागल्या. कुणी दादर ला, कोणी पुण्यात, कोणी गिरगावात तर कोणी ठाण्यात. ते घर मात्र आता राहिलं नाही आणि त्या जागेने, तिथे उभारलेल्या इमारतीमध्ये राहणारी नवी बिऱ्हाडे आता आपलीशी केली असतील. जसं आपल्याला आपलं घर सोडवत नाही तसं घरालाही आपली लोकं जाऊ नयेत असं वाटत असेल नाही का?

माझ्या कॉलेजमधल्याच दुसऱ्या मैत्रिणीचं पुण्यात नवे घर होते. आम्ही सगळ्या जणी त्या वेळी तिथे रहायला गेलो होतो मुंबईहून. खूप मस्त आठवणी आहेत तिथल्या. त्या घराच्या छोट्याशा गच्चीत आम्ही उत्साहाने किती तरी फोटो काढले होते तेव्हा. आता अनेक वर्षानंतर तिचे पुण्यात आणखी एक नवे घर झाले. आत्ताच्याप्रमाणे सजवलेले...सुंदर. पण त्या जुन्या घराविषयी जे प्रेम आणि ओढ वाटते ती वेगळीच.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने तिचा टेरेस असलेला ब्लॉक विकायचा आहे म्हणून सांगितलं. खूप छान आहे घर. मी पाहिलंय. ती म्हणाली की खूप लाभलं ग मला हे घर पण काही कारणांनी ते विकायचं आहे. मी विचार करू लागले की त्या घराचे काय म्हणणे आहे याबद्दल? आता हे घर नव्या कुटुंबाची वाट बघणार. कुठेतरी कोणीतरी अशा घराच्या शोधात असेल. ज्या कोणाला परवडेल तो ते घर अखेरीस घेईल. मग त्या कुटुंबाची नव्या घरातली वाटचाल सुरु होईल तशीच त्या घराचीही या नव्या माणसांबरोबर.

आपल्याला हव्या त्या एरियात असलं तरी तिथलं प्रत्येक घर घेणाऱ्याला आवडतंच असं नाही. पण एखादं घर मात्र अगदी प्रसन्न वाटतं आणि मग त्या ही घराला मिळतो मालक. असंही असेल की बघायला येणारी कुटुंब पाहून एखादं घर आनंदी होत असेल आणि ती सकारात्मक स्पंदनं त्या लोकांना मिळत असतील आणि अशा रीतीने एका रिकाम्या घराला सुयोग्य मालक मिळत असेल.
घरातल्या माणसांमुळे घराला घरपण येतं. एका नीटनेटक्या, रिकाम्या चौकटीला जिवंतपणा येतो. पण कुठलं घर कोण सजवणार हे मात्र एक गूढ असतं नाही?











No comments:

Post a Comment

आपले मत जरूर मांडा.... :-)