माझ्या मैत्रिणी यावर हसायच्या. हिचे “असं कसं नं?” हे प्रश्न फारच गमतीशीर
असतात. अगदी अजूनही त्या मला विचारतात, काय गं? तुझं, असं कसं नं? ऐकलं नाही बरेच
दिवसात.
पण मला तेव्हा अगदी खरच असा प्रश्न पडायचा. विद्यार्थ्यांची इतकी गर्दी असलेल्या
कॉलेजमध्ये नेमक्या आम्ही पाच जणीच कशा एकत्र आलो? किंवा इतर जे ग्रुप बनतात ते ही
कसे नेमके तसेच बनतात?
म्हणजे जसा जगाच्या नकाशावर एखादा विमानमार्ग दाखवताना आपण वेगवेगळी ५ ठिकाणे पाच बिंदूंच्या स्वरुपात एका रेषेने
जोडतो. तेव्हा जसा ग्राफ आपल्याला दिसतो तसाच आमच्या मैत्रीचाही दिसेल नाही?
म्हणजे कॉलेजमधली सगळी मुलं म्हणजे अगणित बिंदू आणि त्यातले नेमके आम्हा
मैत्रिणींचे मैत्रीच्या एका रेषेत जोडले
गेलेले दिसतील. गम्मत म्हणून एक कल्पना मनात येते. देवसुद्धा हे सारे बिंदू पाहत
असेल आणि मग स्वतःच काही विचार करून बिंदूंचे वेगवेगळे गट तयार करत असेल. आणि मग
त्या गटातल्या माझ्यासारख्या एखादीला वाटत असेल की,”कसं न?, आपणच ५ जणी एकत्र
आलो?” असो.
शेजारी राहणारी, एकत्र प्रवास करणारी, कुठल्या तरी अडचणीत मदतीला आल्यामुळे
झालेली मैत्री अशा विविध कारणांनी आपण एकत्र येत असतो हे खरंय. पण या कुठल्या का
कारणाने आपण ‘विशिष्ट’ जण एकमेकांशी मैत्रीच्या नात्याने बांधले जातो. हे असं
एकत्र येणं हे देखील ठरलेलंच असतं बहुधा. कोणाची मैत्री कोणाशी आणि का होते हे खरंच एक
गूढच आहे.
मला आठवतं, मी फ्रेंच भाषा शिकायला जायचे तिथे आम्हा नवशिक्यांचा एक ग्रुप
झाला होता. त्यात कॅथोलिक होते, पंजाबी होते. त्यातल्या अनिता नावाच्या पंजाबी मुलीशी
माझी जरा जास्त मैत्री झाली.
तिचं एका मुस्लीम मुलावर प्रेम होतं. घरून अर्थात विरोध होता. तिने त्याच्याशी
पळून जाऊन लग्न केलं. तो दुबईला राहायचा. तिथे गेल्यानंतरही तिने माझ्याशी संपर्क
ठेवला होता. ती तिथून मला पत्र लिही. मला आठवतं, एका पत्रात तिने मला लिहिलं होतं की
तिच्या घरचे तिच्यावर चिडले आहेत त्यामुळे काही संपर्क ठेवून नाहीयेत. तिने तिच्या
एका चुलत बहिणीला फोन करून तिला पत्र लिहायला सांग असं मला निरोप दिला. मी ही तो
दिला. मग यथावकाश, घरी सगळं आलबेल झालं. ती तिथे खुपच खुश होती. या अनिताशी आता
माझा काहीही संपर्क नाही. मला ठाऊक नाही ती अजूनही तिथेच आहे की भारतात परतली आहे
आणि तिलाही माझ्याबद्दल काहीच ठाऊक नसणार. या अनिताशीच तेव्हा माझी जास्त मैत्री
का झाली आणि आता ती अजिबात का नाहीये याला काहीच उत्तर नाही. कालौघात मैत्रीची वीण
सुटली हेच खरं.
नंतर वंदना नावाची माझी फ्रेंचच्या पुढच्या क्लास मधली मैत्रीण होती.
तिच्याबरोबर मी रोज तिच्या बाबांच्या जीप मधून वांद्र्याला क्लासला जायचे. क्लास
संपल्यानंतर संपर्क तुटला. अनेक वर्षांनी ती मला अचानक पुणे स्टेशन वर भेटली. लग्न
होऊन ती आता पुण्याला असते हे कळलं. खरं तर आमची फक्त क्लास पुरती मैत्री होती.
कधी मधी तिची आठवण येण्यापलीकडे मला फारसा काही फरक पडला नसता पण तरीही ती मला
अचानक भेटावी, ध्यानीमनी नसताना आणि ते ही पुणे स्टेशन वर! पण मग मला जास्त जवळची
असलेली अनिता मात्र अशी अचानक कुठे का नाही भेटली अजून?
मी “नकळत सारे घडले” नाटकाच्या दौऱ्यावर लंडन ला गेले होते. तिथे आमच्या ग्रुप
ची ज्या हॉटेलात राहायची सोय केली होती त्या हॉटेलात एक मराठी मुलगी काम करत
होती...मार्केटिंग विभागात. एकदम चुणचुणीत मुलगी ..नाव सलोमी. एक मराठी ग्रुप इथे
राहतोय म्हटल्यावर आम्हाला येऊन भेटली. जमेल तशी मदत करायची. सर्वांशी तिने गोड बोलून
ओळख करून घेतली. माझ्या वयाची असल्याने माझी तिच्याशी मैत्री झाली. “पुण्याला आले
की तुला फोन करीन नक्की” असं मी तिथून निघताना मला म्हणाली. मग इमेल वरून आम्ही
संपर्क ठेवला. पुण्याला आली तेव्हा मला तिने न विसरता फोन केला. आणि माझा मुंबईचा
पत्ता आणि फोन नंबर निघताना हरवला असूनही, ३ वर्षांपूर्वी मी सांगितलेल्या
बिल्डिंगचं नाव हुडकत ती चक्क माझ्या घरी येऊन धडकली. अजूनही आम्ही नियमित
संपर्कात आहोत कारण आता तर फेसबुक मुळे सगळं सोपं झालंय. एका पुण्यातल्या
मराठमोळ्या मुलीशी माझी ओळख मात्र झाली सातासमुद्रापार असलेल्या लंडनमध्ये. गेली ७
वर्षे, स्वतःच्या बळावर एकटी लंडन ला राहणारी ही मुलगी, नोकरी करून तिथे
पदव्युत्तर शिक्षण घेत होती. ते पूर्ण झाल्यावर नोकरी शोधून अर्थार्जन ही सुरु
केलं. शिवाय एकटी सगळं जग फिरणारी ही धडाडीची मुलगी मला आयुष्यात भेटणं माझ्यासाठी
खूप प्रेरणादायी होतं. तिच्याकडून आयुष्याबद्दल एक सकारात्मक दृष्टीकोन मला
मिळाला. आणि म्हणूनच तिची माझी भेट आणि ओळख होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं.
काही माणसं काहीतरी शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात येतात नाही?
प्रपंच आणि ४०५ आनंदवन च्या लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, ज्या
जपानी महिकारी च्या उपासक आहेत, त्या महिकारीतील एक संकल्पना नेहेमी सांगायच्या की समजा बस मधून जाताना कोणाच्या शर्टाची बाही
जरी आपल्याला चाटून गेली तरी त्याचं आणि आपलं पूर्वजन्मीच काही नं काही connection असतं.
असेलही. कारण खरंच काही वेळा काही व्यक्ती आपल्या आयुष्यात का येतात ते
आपल्याला उमगत नाही. कारण त्या आपल्याला त्रासच देऊन जातात..आणि ते ही काहीही
संबंध नसताना. याउलट काही व्यक्ती अगदी सहज येऊन आपल्याला त्यांचा परीसस्पर्श देऊन
जातात.
काही सुहृद शत्रू ही वागणार नाही असं आपल्याला टोचून जातात तर काही मित्र अगदी
रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन आपल्यासाठी जीव टाकतात. हे सगळं आपल्या आकलनशक्तीच्या
पलीकडलं आहे की नाही?
गेल्या दहा वर्षांत झालेल्या टेक्नोलोजीच्या प्रगतीमुळे हल्ली फेसबुक, स्काईप
वरून अक्षरशः हजारो जणांशी कनेक्टेड राहता येतं. मैत्रीच्या जगतातला हा एक
मोठा क्रांतिकारी बदल आहे. आपली मैत्री आता वैश्विक पातळीवर गेलीये.
साता-समुद्रापार असलेल्या लोकांशी आपण चुटकीसरशी, बसल्या-बसल्या हातातल्या
मोबाईलवरून संपर्क ठेवू शकतो. फार वर्षांपूर्वी “पेन-फ्रेंड” नावाची नवी संकल्पना
मैत्रीच्या या जगात रुजली होती. तीही कालौघात विसरली गेली. पत्रव्यवहार आता जवळ
जवळ संपलाच. फेसबुकमुळे मैत्री सोप्पी झालीये पण त्यामुळे ती सरसकट होऊ लागलीये.
म्हणजे आता गूढ रीतीने, अतर्क्य पद्धतीने मैत्र निर्माण होण्यातली गंमत काहीशी कमी
झालीये. कारण एकमेकांना शोधणं आता सोपं झालंय. कोण कुठे आहे हे हवं असेल तर टाका
फेसबुकवर नाव आणि मिळवा माहिती.
पण दुसऱ्या बाजूने हे ही खरंय की जी अनिता मला गेल्या पंधरा वर्षांत कुठे
अचानक भेटली नाही ती फेसबुकवर भेटू शकेल.
नव्या युगातल्या नव्या बदलाशी मैत्री करणे अपरिहार्य आहे हे खरेच.
Chhan.avadla lekh
ReplyDeleteअप्रतिम लेखन आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा प्रवहितपणा आपल्याला खिळवून ठेवतो
ReplyDeleteशर्वरी u r best
keep writtng
Thank you Vivek and Nilu.
ReplyDeletesharvari.........tooo guuud.........i was required to complete reading at 1 go wne started...can not overlook or think i wud read later on.......
ReplyDelete