Saturday, June 29, 2013

पाब्लो एस्कोबार.

"सोळा वर्षांच्या आपल्या मुलाशी फोनवर केवळ काही सेकंद जास्त बोलणं त्याला चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी माग काढून त्याला आपल्या बंदुकीचं लक्ष्य बनवलं. त्याचा  मुलगा, मुलगी, आणि बायको जीवाच्या भीतीने पळाली. कुठल्याच देशात त्यांना थारा  मिळत नव्हता. इक़्वेडोर, पेरू, ब्राझील, साउथ आफ्रिका आणि मोसाम्बिक अशा ठिकाणी रहात रहात पर्यटक म्हणून त्यांनी अर्जेंटिनामधे प्रवेश मिळवला आणि ब्युनोस आयर्स येथे अखेर त्यांना आश्रय मिळाला. तिथे नावं बदलून ते सामान्य जीवन जगू लागले. "
ही कुठल्याही सिनेमाची कथा नसून एक सत्यकथा आहे. कोलंबियामधील अत्यंत क्रूर, अट्टल गुन्हेगार असणाऱ्या ड्रग माफिया "पाब्लो एस्कोबार" आणि त्याच्या निष्पाप कुटुंबाची ही खरीखुरी चित्तरकथा.
कोलंबियात १९८० च्या दशकात या ड्रग माफियाचा प्रचंड दरारा होता. पाब्लो एस्कोबारला लहानपणी खरं तर कोलंबियाचा प्रेसिडेंट बनायचं होतं. प्रेसिडेंट बनू शकला नाही पण अत्यंत चुकीच्या मार्गाने तो त्या देशावर जवळ जवळ हुकुमत गाजवणारा क्रूरकर्मा मात्र बनला. पेरू आणि बोलीव्हियातून कोको पेस्ट आणून, तिच्यावर प्रक्रिया करून ती अमेरिकेत विकणं हा धंदा सुरु करून पुढे त्याने ड्रग विकणारी सगळ्यात धोकादायक अशी टोळी निर्माण केली. या टोळीने कोलंबियावर अक्षरशः वर्चस्व गाजवलं.
 "प्लाटा ओ प्लोम्बो" म्हणजे शब्दशः "चांदी किंवा शिसे " या सूत्राने ही टोळी काम करे. म्हणजे कोलंबियातील कोणीही राजकारणी, जज किंवा पोलीस जर एस्कोबारच्या विरोधात जाऊ लागला तर त्याला प्रथम लाच देऊ पहायची नाहीतर सरळ मारून टाकायचं. अशा रीतीने कोलंबियाच्या प्रेसिडेंटपदाचा उमेदवार लुईस कार्लोस गालान आणि कोलंबियाचे न्यायमंत्री रोड्रिगो लारा यांची हत्या एस्कोबारने करवली. त्याच्या "मेडेलिन कार्टेल(टोळी)" ने अशा रीतीने हैदोस घातला होता. अर्थात तो अत्यंत हुशार गुन्हेगार होता. मेडेलिन शहरासाठी त्याने भरपूर धनदान केलं. चर्चेस बांधली. शाळा, उदयाने शिवाय गरिबांसाठी घरेही बांधली. त्यामुळे मेडेलिन जनतेच्या मनात त्याने "दाता" म्हणून घर केलं. त्याची स्वतःची अनेक मोठी घरं होती, विमानं होती. चक्क एक प्राणी संग्रहालयदेखील होतं. ऐंशीच्या दशकात एस्कोबार हा जगातल्या अत्यंत प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होता. आणि जगातला सातवा "श्रीमंत"!

अमेरिकन सरकारला एस्कोबार ड्रगच्या व्यापाराच्या आरोपाखाली हवा होता, परंतु कोलंबियात त्याची प्रचंड दहशत, त्यामुळे कोलंबियन सरकार आणि एस्कोबारच्या वकिलांनी मिळून एक मधला मार्ग काढला आणि त्याला शरण येण्यास सांगितले. त्याला ५ वर्षांचा कारावास देण्यात आला. या बदल्यात त्याने स्वतःच स्वतःसाठी तुरुंग बांधावा. असे केल्यास त्याला अमेरिकेच्या हवाली देण्यात येणार नाही असा तो मधला मार्ग. मग काय? तुरुंगाच्या नावाखाली त्याने "Le Cathedral"  नावाचा मोठ्ठा किल्ला बांधला ज्यात जाकुझी, धबधबा, बार आणि चक्क सॉकरचं मैदान होतं. शिवाय इतर मालमत्ता, पैसे होतेच. तुरुंगातही त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या. आपल्याशी गद्दारी केलेल्या आपल्याच टोळीतील अनेकांना त्याने या तुरुंगात आणून मारलं. मग मात्र त्याला साध्या तुरुंगात हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला. ते कळल्यावर एस्कोबार पळाला आणि लपून राहू लागला. शेवटी १९९३ मधे मेडेलिन पोलिसांनी त्याला मारण्यात यश मिळवलं. अशी ही या क्रूरकर्म्याची कथा..

 पाब्लोचं वादळी आयुष्य वाचताना मनात विचार आला की आपण सामान्य माणसे आपलं साधारण आयुष्य जगताना, त्यात कितपत चांगले किंवा वाईट योग येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी पत्रिका बनवतो. ज्योतिषांना दाखवतो. माणूस जन्मल्या-जन्मल्याच तो पुढे कोण आणि कसा होणार आहे हे खरंच ठरलेलं असतं का? "विधिलिखित" असं ज्याला म्हणतात. जन्मवेळेवरून केलेल्या पत्रिकेच्या अभ्यासावरून ती व्यक्ती पुढे कोण होणार आहे हे कळत असेल तर पाब्लो एस्कोबार किंवा त्याच्यासारखे अन्य हिंस्त्र मानव कुठलं नशीब घेऊन जन्माला येतात? आणि जर आधीच हे भविष्य कळणार असेल तर मग अशी माणसे घडण्यापासून थांबवता आली पाहिजेत, नाही का? शिवाय या माणसांच्या हातून मारलं जाण्याचं कमनशीब घेऊन जन्माला आलेल्या माणसांची पत्रिका नेमकं  काय सूचित करत असेल? माझ्यासाठी हा नेहेमीच एक गूढ विषय असणार आहे.

पाब्लो एस्कोबार हा अभिमान वाटेल असा "वडील" नव्हता. जुआन आणि मन्युएला या त्याच्या दोन मुलांनी त्यापायी कसं आयुष्य घालवलं असेल? अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्समधे ते सध्या सर्वसामान्य आयुष्य जगतायत पण हा भयानक इतिहास ते पुसू शकले का? त्याबद्दल पुढील लेखात...

Wednesday, June 19, 2013

माझा खेळ मांडू दे.....!


मनी आणि टिनी “साप-शिडी” खेळतायत.
“याहू, मला शिडी मिळाली. मी ९६ वर आले.. आता फक्त ४ पडले की मी जिंकले...” मनी खुश होऊन म्हणते.
टिनी बिचारी खूप मागे पडलीये. मनी अगदी विजयाच्या जवळ आलीये हे पाहून तिला जरा वाईट वाटतंय पण करणार काय? ती गुपचूप दान टाकते. चार घरं पुढे जाते. अरेरे, अगदी एकाने शिडी चुकली. जाऊदे. आता काय, मनी जिंकणार!
मनी ने उत्सुकतेने दान टाकलं. “४ पडूदेत, ४ पडूदेत” मनाशी धावा चालू होता. शेवटी धीर एकवटून तिने दान टाकलं. आणि बघते तर काय? २ पडले.
“अरे देवा, ९८ वर एक भला मोठा साप. गिळून टाकलं त्याने मनी ला. एकदम खाली दुसऱ्या घरात पाठवलं तिला.  मनी जिंकता जिंकता राहिली. आता काय, २ म्हणजे खेळ पुन्हा पहिल्यापासून सुरु केल्यासारखं आहे. पण इलाज नाही. मनी खट्टू झाली.
मघाशी मागे असलेली टिनी त्यामुळे एकदम पुढे गेली. अर्थात तिलादेखील कुठे माहित्ये की पुढे काय होणार? ती जिंकणार की मनी पुन्हा पुढे जाणार? हीच तर या खेळाची गम्मत आहे. काहीच सांगता येत नाही आधी, पुढे काय होणार ते!
एका मैत्रिणीच्या घरी सापशिडीचा खेळ एका कापडी पटावर खूप अभिनव पद्धतीने तयार केलेला मी पाहिला. गंमत म्हणून आम्ही दोघी तो खेळू लागलो. मोठेपणी खेळताना, इतक्या वर्षांनी अचानक मला जाणवलं की या खेळाचं सूत्र “आयुष्यातली अनिश्चितता” याच खऱ्या आयुष्यातल्या गूढ बाबीवर आधारलेलं आहे. पटावरच्या शिड्या म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या संधी आणि त्यामुळे होणारी आपली प्रगती तर साप म्हणजे अधोगतीकडे नेणाऱ्या गोष्टी किंवा घटना जसं अपघात, लबाडी, खोटेपणा, फसवणूक इत्यादी.
म्हणजे, आपण आपलं दान टाकत रहायचं आणि एक एक घर पुढे जात रहायचं. साप आणि शिड्या दिसत तर असतात पण त्या मिळतील की नाही हे आपल्या हातात नसतं. कारण दान टाकणं जरी हातात असलं, तरी नेमका हवा तोच आकडा येईल कशावरून?
हा खेळ ज्या कोणी शोधून काढला त्याने हाच विचार केला असेल का? या कुतूहलापोटी
या खेळाचा इतिहास शोधायचा प्रयत्न केल्यावर कळलं की या खेळाचा उगम भारतातलाच. “मोक्ष पतामू” या नावाने हा खेळ प्राचीन भारतात खेळला जाई. त्या ही आधी, १६व्या शतकात, हा मूळ जैन खेळ “लीला” या नावाने ओळखला जाई. आपल्या दैनंदिन आयुष्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या खेळामागच्या हिंदू विचारसरणीमुळे प्रभावित होऊन हा खेळ इंग्लंडमध्ये एका वेगळ्या प्रकारे तयार केला गेला. 
“मोक्ष पतामू” या नावाने हा खेळ बहुदा भारतीय अध्यात्मिक गुरूंनी तयार केला तो लहान मुलांना चांगल्या कृतींच महत्त्व पटवण्यासाठी. शिड्या म्हणजे विश्वास, खरेपणा, उदारपणा यासारख्या गुणांचं प्रतिक तर साप म्हणजे चोरी, खून, राग, हाव किंवा लालसा यांसारखे वाईट गुण! या खेळाचा उद्देश म्हणजे सद्गुणांचा वापर करून दुर्गुणांवर विजय मिळवून मोक्षप्राप्ती करणे हा असे. चांगल्या वागणुकीमुळे मोक्ष मिळेल तर वाईट वागल्यास किडामुंगीचा जन्म मिळेल. शिवाय शिड्यांची संख्या सापांपेक्षा कमी ठेवून, खऱ्या आयुष्यात, सद्वर्तनाचा मार्ग हा पापाच्या मार्गापेक्षा खूप खडतर आहे हेच सुचवायचं आहे.
पहा नं, सापशिडी सारख्या साध्या खेळाच्या निर्मितीमागे मनोरंजनापलीकडे असा काही उद्देश असेल असं आपल्याला वाटतं तरी का?
आता दुसरा खेळ घ्या. पत्त्यांचा...”भिकार-सावकार”. या खेळात देखील तेच सूत्र.
दोघांनी दोन गठ्ठे करून पत्ते वाटून घ्यायचे. ते उलटे ठेवायचे आणि एक एक पान सुलटत जायचं. कुठल्या रंगाचं पान येईल ते आपल्याला माहित नसतं. नशिबानेच तुम्ही त्यात भिकारी किवा सावकार होता. बरे, या खेळाला काही बाकी नियम नाहीत त्यामुळे लहान मुलांना आधी हाच खेळ शिकवला जातो. नियमांची क्लिष्टता त्यांना कळणार नाही म्हणून मग हा सोपा खेळ. नुसतं आपलं पान सुलट करत जायचं, पुढे काय होईल ते होईल. आता हेच आपल्या आयुष्याचही गमक नाहीये का? आपण आपलं काम करत जायचं, जिंकण्यासाठीच प्रयत्न करायचे पण अंतिम निकाल आपल्या हाती नाही. आहे की नाही गंमत?
या दोनच खेळांविषयी मी लिहिण्याचं कारण म्हणजे हे दोन्ही खेळ नशिबावर अवलंबून खेळावे लागतात. त्यांना काही विशेष नियमावली नाही आणि कोणती “strategy” ही नाही. आणि हेच दोन खेळ सर्वात आधी आपण शिकतो आणि खेळतो.
हे खेळ ज्यांनी कोणी तयार केले त्यांनी लहानपणीच मुलांना “आयुष्यातल्या जुगाराचे” बाळकडू दिल्यासारखं आहे नाही? म्हणजे असं मला वाटतं. फक्त ते समजण्या इतकी प्रगल्भता मुलांमध्ये नसते. या खेळांमधून इतक्या लहान वयातच आपल्याला आपल्या पुढील आयुष्याबद्दल थोडी कल्पना मिळते. किंवा “आयुष्य म्हणजे काय” याची एक झलक या खेळांमधून मिळते असं म्हटलं तर ते अधिक योग्य होईल. मी सुरुवातीला लिहिलेला किस्सा आपल्या लहानपणी आपण प्रत्येकाने अनुभवला आहे की नाही?
खरं तर आपल्या आयुष्याला अजाणतेपणी सुरुवात करताना, लहान मुलांना हे असंच आपलं आयुष्य असतं हे कळलं तर किती छान होईल. म्हणजे ती लहानपणीच अगदी तय्यार होतील. आयुष्यातल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी पचवण्यासाठी. पण तसं होत नाही. कारण जसजसे आपण मोठे होतो, अनुभव घेतो, तसतसं आपल्याला आयुष्याचा अर्थ उलगडत जातो. पण म्हणतात नं, कुठल्याही गोष्टीला short cut नसतोच कधी.
मोठेपणी आपण हे खेळ विसरूनही गेलेलो असतो. मग पुन्हा ते खेळ येतात आपल्या मुलांच्या निमित्ताने. तोपर्यंत आपण त्यातल्या बऱ्याचशा शिड्या चढलेल्या असतात आणि अनेक सापही पाहिलेले असतात. त्यामुळे पुढच्या आयुष्याची कल्पना नसलेल्या निरागस मुलांइतक्या उत्साहाने आपण तो खेळ मोठेपणी नाही खेळू शकत.
अगदी कळायला लागतानाच जे लहानांना खेळांमधून अप्रत्यक्षपणे शिकवलं जातं ते समजून घेण्याची त्या वयात त्यांची कुवत नसते. आणि जेव्हा ती कुवत येते, तोपर्यंत ते बालपण संपलेलं असतं. ती प्रगल्भता येण्यासारखी आयुष्यातली ही अनेक वर्ष घालावावीच लागतात. म्हणजे जे गमक लहानपणीच कळलं तर आपलं आयुष्य खूप समजून जगता येईल असं वाटतं, ते खऱ्या अर्थाने कळायला आपल्याला मोठंच व्हावं लागतं.

(नवशक्ती या वर्तमानपत्रासाठी मी "गूढनवल" हे सदर लिहीत असे. त्यातला हा एक लेख)

Friday, June 14, 2013

हा क्षण!

आज इतका सुंदर पाऊस पडतोय. वाटलं काहीतरी छान करावं.
मग इथे लिहायला घेतलं.
नवा ब्लॉग...मनस्वी.

सकाळी  मी स्वच्छता मोहीम राबवली. म्हणजे "cleaning the clutter". एक कप्पा नीट पुसून लावून ठेवला.
घरात  किती विविध कपाटे आणि कप्पे. तिथे काय काय जमून, साचून रहातं. धूळ जमते.
घाईत आपण दुर्लक्ष करतो. बघू, वेळ मिळाल्यावर नीट ठेवू म्हणतो.
गोष्टी जमत जातात. एकावर एक टाकल्या जातात.
कधी कधी वरवरचं आवरतो आपण. मग जरासं बरं वाटतं. पण जरासच. कारण खालच्या वस्तू गुदमरतात. त्यांच्या नाका-तोंडात धूळ गेलेली असते आपण वरवर झटकलेली.
मग  त्या वाट पहात रहातात...

गेलं वर्षंभर मी ही खूप वाट पहात्ये.
मनातल्या साठलेल्या, उरलेल्या, विसरलेल्या, जपलेल्या, राहून गेलेल्या, हट्टाने ठेवलेल्या, प्रयत्न करूनही न विसरलेल्या अशा अगणित गोष्टी, किस्से, आठवणी, वचने, शब्द, भावना, राग, त्वेष, ठसठस...हे सगळं विसरून कसलीतरी वाट पहात्ये. नव्याची!
कधी नव्हे इतकी भविष्याबद्दल विचार करत्ये....
कधी नव्हे ते मन इतकं मोकळं ठेवलंय....नव्यासाठी.
खरंच सगळं विसरून गेले आहे...गेल्या काही वर्षातलं....राहिलेलं आणि ठेवलेलं.

नव्याविषयी अनेक कल्पना रंगवत्ये मनात...
मन विश्वास ठेवत नाही काही वेळेला. पण ठीक आहे.
मनाला आपणच शिकवायचं असतं. विश्वास ठेवायला.
झगडा चालू रहातो. मग समजवायचं मनाला. गप्प करायचं.

मुख्य म्हणजे घरात वस्तू साठून रहातात पण मनात मात्र विचारांची सतत वर्दळ असते.
ती आपण नियंत्रित करायची. आणि काही साठून द्यायचं नाही.
थोडक्यात, मनाचं ""cleaning the clutter" सतत करत रहायचं. असं मी ठरवलंय.

आज छान पाऊस पडतोय. मी त्याचाच आनंद घेत्ये.
जुने पाऊस विसरून जायचे. किंवा चित्रासारखे फ्रीझ करून ठेवायचे.
सहज  मागे वळून एक नजर टाकायला. पण त्यात रमायचं नाही फार.
आता फक्त नव्याचा आनंद घ्यायचा.
आणि नवीन म्हणजे ताजं, आत्ताचं, या क्षणाचं.
कारण तेच खरं आहे. तेच आहे. आत्ता आहे पण मग नसेल.
म्हणून आत्ता जगूया.
हा श्वास खरा, हा क्षण खरा....
स्वच्छ, ताजा, मोकळा, सुंदर!