Monday, October 7, 2013

आयुष शाळेत जातो.



मैत्रिणीबरोबर तिच्या गावी गेले होते तेव्हाची गोष्ट.
आम्ही गाडीतून जाताना तिच्या गावातल्या फार्म हाउसवरची मेस सांभाळणारा एक नेपाळी तरुण, त्याची बायको आणि मुलगा बरोबर होते. मी एक-दोनदाच त्या छोटयाकडे पाहिलं होतं. तो हसरा होता पण अख्ख्या २-२.३० तासांच्या प्रवासात बोलला मात्र काहीच नव्हता.

गावात पोहोचलो. घरी गेलो आणि हा छोटा एकदम खुलला. मैत्रिणीने नव्यानेच पाळलेल्या “जिवा” कुत्र्याबरोबर आणि छोटया “सिकंदर” बोक्याबरोबर अगदी मनसोक्त खेळला. त्याच्या लहेजामधे तो “जुवा” आणि “सिकांदार” अशा हाका मारत होता. मला मज्जा वाटली. ३ वर्षांचा मुलगा बाकी काही बोलत नाही अजून हे लक्षात आलं. एखाद-दोन शब्द बस. संध्याकाळी तिथेच “क्वेस्ट” या शिक्षण प्रकल्पाचा सर्वे-सर्वा असलेला निलेश निमकर भेटला त्याने काळजीने या छोट्याचा म्हणजे आयुषचा विषय काढला. तो म्हणाला की त्याला कुठल्याच भाषेत एक वाक्य बोलता येत नाहीये. एव्हाना त्याला यायला हवंय. त्याच्याशी कुठल्या तरी एका भाषेत तरी बोललं गेलं पाहिजे. त्याच्या मातृभाषेत म्हणजे नेपाळी मधे तरी. मग लक्षात आलं की मुलाला इंग्लिश किंवा हिंदी यावं म्हणून आई-बाबा नेपाळीमधे बोलण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे आपली मातृभाषा सतत त्याच्या कानावर पडत नाही. काही शब्द सोडले तर त्याला स्वतःला व्यक्त करायला वाक्ये म्हणता येत नाहीत.

मला आणि मैत्रिणीला स्फुरण चढलं. या आयुषशी आपण खूप बोलायचं. लहान वयात कितीही भाषा मुले पटकन आत्मसात करू शकतात. मग मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांत आम्ही आयुषला आकडे, अक्षरं बोलायला शिकवू लागलो. तो ही अगदी हसतमुखाने जमेल तसं बोलू लागला. मग गावातल्या शाळेत त्याने जावं असं ठरवून दुसऱ्या दिवशी आयुषला घेऊन मी आणि मैत्रीण शाळेत पोचलोदेखील. गावातली छोट्यांची शाळा. तिथेही आयुष त्या दिवशी हसत हसत इकडे-तिकडे बघत होता. जमेल ते आणि तसं शिकत होता. मी आणि मैत्रीण खुश झालो.

छोटयाशा आयुषला माझ्या मैत्रिणीचा हात धरून शाळेत जाताना पाहून मला वाटलं की किती नशीबवान मुलगा आहे हा. याच्या आजूबाजूला शिक्षणक्षेत्रात अतिशय जागरूकपणे आणि आपले जीवन त्या कामी वाहून टाकून काम करणारी सुशिक्षित, प्रगल्भ माणसे आहेत. त्यांचं याच्यावर लक्ष आहे आणि याने शिकावं म्हणून ते आग्रहाने प्रयत्न करताहेत. त्याच्या नेपाली आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व ते समजावू शकतील.

गावातल्या शांत आणि नैसर्गिक वातावरणात मोकळेपणी वावरणारा, कुत्रा आणि मांजर ज्याचे खरे दोस्त आहेत(कारण त्यांना भाषेची गरज नाही) असा हा आयुष पहिल्या दिवशी शाळेतून आला आणि जीवाकडे ज्या एका वेगळ्याच एनर्जीने धावत आला, ते पाहून मला खात्रीच पटली की आपण कोणाच्या सहवासात मोठे होतो हे किती महत्वाचं आहे. या मंडळीच्या नजरेस हा मुलगा न पडता तर तो कदाचित शाळेत गेलाही नसता. असाच इकडे-तिकडे करत मोठा झाला असता आणि कदाचित वडिलांसारखंच कुठेतरी काम करत असता. पण आज या लहानग्याच्या आयुष्याला एक दिशा मिळालीये. तो पुढे किती शिकेल, काय करेल आत्ता सांगता येणार नाही. पण त्याला एक संधी तर मिळाली. अनेकांना ती सुद्धा मिळत नाही.


सहज खेळता-बागडता, गावातल्या हिरवाईतून शाळेत जाता जाता, शिक्षणाचं शहरात असतं तसं कुठलंही प्रेशर न घेता आयुष आपलं आयुष्य अगदी सहज घडवेल ही शक्यता आता त्याच्या बाबतीत निर्माण झालीये.
पहिल्याच दिवशी खांद्यावर टेडी बेयरच दप्तर आणि हातात सफरचंद घेऊन शाळेच्या दिशेने पावलं टाकणारा आयुष कुठपर्यंत पोचेल हे येणारा काळ ठरवेल. पण आता त्याच्यासाठी पाटी आणि खडू घ्यायला हवेत आणि वही सुद्धा हे ठरवणारी (त्याच्या आई-वडिलांव्यतिरिक्त) मोठी मंडळी जोपर्यंत त्याच्या आजूबाजूला आहेत तोपर्यंत त्याची वाट चुकणार नाही ही खात्री वाटत्ये.




1 comment:

आपले मत जरूर मांडा.... :-)