“जी गेली ती ती नव्हतीच. नाही, ही ती असूच शकत नाही.
ती कशी होती...तजेलदार, खुटखुटीत, हसरी, बडबडी, अत्यंत आग्रहाने आणि
प्रेमाने आल्या-गेल्याला खाऊ पिऊ घालणारी. सगळा जीव त्या जेवणात अडकलेली.
काल जी गेली ती ही माझी आजी नव्हतीच. किती वेगळी दिसत होती काल.
तिच्या घरात इतकी माणसं जमलेली असून ती मात्र शांत झोपली होती. एरवी हे केवळ
अशक्य. एरवी ती स्वयंपाकघरात असली असती. “हे खा गं, ते घे रे अजून...कसं झालंय?
अं....आजीच्या हातासारखी चव मिळेल का कुठे?” असं डोळे मिचकावत म्हणणारी माझी आजी
गेली होती. आजपर्यंत तिच्या घराला जिवंतपणा केवळ तिच्यामुळे होता....आणि आज मात्र तिच्यासाठीच
जमलेल्या इतर लोकांच्या उपस्थितीने ते घर उगाच केवीलवाणे जिवंत होऊ बघत होतं. आपली
माणसे दिसल्यावर डोळ्यात चमक येणारी आजी मात्र आज शांत होती.
माझी ही आजी खास होती खरंच. फक्त स्वतःच्या नातवंडांवर नव्हे तर
आम्हासारख्या मावस-चुलत वगैरे सगळ्यांवर तिची सारखीच माया होती. तिच्यामुळे माझी
न्याहारीच्या भाकरीच्या काल्याशी ओळख झाली. त्याची चव आजीकडे जशी लागायची नं तशी कुठ्ठेही नाही. जीवन भरभरून जगण्याची उमेद मी तिच्यात पाहिली. लग्नानंतर अत्यंत
सुस्थितीत असलेली माझी ही मावस आजी त्या काळात तर लोकांचं मुक्तहस्ते करायचीच. पण
नंतर नंतर परिस्थिती काहीशी बदलल्यानंतर देखील ती होती तशीच होती. भरभरून देणारी.
आलेल्या संकटांनी कधी उदास झालेली मला ती दिसलीच नाही. माझी सख्खी आजी, म्हणजे हिची मोठी बहिण, ती देखील अशीच खंबीर. हाडांच्या अतिशय दुर्मिळ अशा आजारामुळे २० वर्षं तिने अंथरुणाला खिळून काढली पण धीराने आणि संयमाने. कधी त्रागा नाही. स्वतःला चालता-फिरता येत नाही म्हणून आमचं कौतुक कुठे कमी नाही.
या पिढीत एक खंबीरपणा मुळातच असावा असं मला वाटतं. एकत्र कुटुंबात
राहिल्यामुळे असेल, अनेक भावंडं असल्यामुळे असेल, तसे संस्कार झाल्यामुळे असेल,
आपण एकटे नाही घरात बरेच लोकं आहेत या विश्वासामुळे असेल पण ही पिढी खमकीच एकूण.
या अशा आज्या आता असणार आहेत का यापुढे? की ही आता दुर्मिळ होत जाणारी
जमात होणारे? माझ्या आई-बाबांची जी पिढी आहे त्या पिढीत असतील किंवा आहेत अशा
आज्या...पण हळू हळू हे कमी होणारे नाही का? कारण आता पिढ्या किती बदलत चालल्या
आहेत. घराला वाहून घेणाऱ्या, आणि तेही आनंदाने, स्वखुशीने करणाऱ्या गोडू गोडू आणि
जाडू जाडू असणाऱ्या, पदराला हात पुसत बाहेर येणाऱ्या, स्वयंपाकघरात मन रमणाऱ्या,
कुटुंबाला पोटभर प्रेमाने खाऊ घालण्यात सर्वोच्च सुख मानणाऱ्या आया आणि आज्या आता
खरंच दुर्मिळ होणार आहेत.
माझा सत्तरीच्या घरात असलेला मामा माझ्या आईला म्हणत होता की “आता
मुलांना माणसे, नातेवाईक नको असतात गं. पूर्वीसारखं राहिलं नाही. जाणं-येणं किती
कमी झालंय”. हे खरंच आहे. पण ही पिढी, जी आपल्या आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांना
घाबरून राहिली ती आता आपल्या मुलांना घाबरून रहाते. घाबरून म्हणजे त्यांच्या
आयुष्यात आपल्यामुळे काही अडथळा नको, आपल्यामुळे त्यांचा वेळ जायला नको असा विचार
करत रहाते कारण ती बिचारी आजच्या मुलांची ओढाताण, धावपळ बघत असते. ती समजून
घेण्याचा प्रयत्न करत असते. बदलता काळ हेच याचं कारण असलं तरी शेवटी त्यात भरडली
जाते ती ही आता वयापरत्वे हळुवार झालेली, माणसांची सवय असलेली पण आता त्यांची
कमतरता जाणवणारी जुनी पिढी. जुनी! हा शब्दच किती त्रासदायक आहे नं. जुन्याने मागे
होऊन नव्याने पुढे येणे हे नैसर्गिकच आहे पण जेव्हा त्या जुन्या पिढीत आपल्याला
आपले एकेकाळी कर्तुत्ववान असलेले आई-बाबा, मामा-मामी, आणि काका-काकू दिसू लागतात, तेव्हा काळजात कळ येते.
पुण्याची आजी गेली आणि अशीच कळ उठली. कुठलीही अपेक्षा न करता फक्त
प्रेमानेच न्हाऊ-माखू घालणारी ही आजी आता पुन्हा कधीच मला दिसणार नाही. सर्वांसाठी जिच्याकडे नेहेमीच वेळ असायचा तिची इथली वेळ संपली.
तिच्याकडून मिळालेला वात्सल्याचा आणि मायेचा वारसा मी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकेन का?
आणि मी प्रयत्न केला तरी पुढची पिढी तो घेण्याच्या मनोवस्थेत असेल का? हे सगळं करायला, व्यक्त व्हायला लागणारा वेळ माझ्याकडे आणि तिच्याकडे तरी असेल का?
Apan hyanchya ghari gelo hoto na? Punyala?? Ki mi minu barobar gele hote??
ReplyDelete