Monday, September 16, 2013

कोलाहल!



मैत्रिणीच्या गावातल्या निसर्गाकडून अंगात शोषून घेतलेला शांतपणा मला आनंद देतोय न देतोय तोच सुरु झाला ... आपल्याकडे दर महिन्याला वेगवेगळ्या कारणांनी निर्माण होणारा...
एक कोलाहल!


गणेशोत्सवाच्या निमित्ताने परत एकदा अंगावर आला तो म्हणजे प्रसारमाध्यमांचा कोलाहल. अरे हो, हळू हळू सांगा नं सगळं. किती वेगवेगळे मुद्दे म्हणजे अनेक गंभीर गुन्हे, छोटे-मोठे गुन्हे, राजकारण, सिनेमे  आणि गणेशोत्सव सगळं काही एकाच वेळी एकामागोमाग एक चालू. जराही उसंत नाही. भडीमार सगळ्याचा. कोण कसा गणेशोत्सव साजरा करतोय हे दाखवण्यात तर ऊत आलाय सगळ्यांना.

मला तर असं वाटतं की आता या उत्सवांच्या सार्वजनिक स्वरूपावर मर्यादा आणावी (त्याला कोणी भीक घालेल का शंका) त्यापेक्षा बंदीच आणावी. इथे रुपया घसरतोय, आपली बायिंग पॉवर क्षीण होत चाललीये, राजकारणात अनेक उलथा-पालथी होऊ घातल्या आहेत, देशात स्त्रियांना बाहेर पडायला भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण होऊ लागलीये, नरेंद्र दाभोलकरांसारख्या सामाजिक भान असणाऱ्या माणसाची दिवसा ढवळ्या हत्या होते, त्यांचे खुनी अजून सापडत नाहीत या अशा सगळ्या कोलाहलात गणेशोत्सव साजरे करण्यात पैसे आणि वेळ घालवायचा...पोलिसांना रहदारी सांभाळण्याच्या अतिरिक्त कामात व्यस्त ठेवायचं...त्यापेक्षा आपण घरच्या घरी नाही का हा उत्सव साजरा करू शकणार? या कोलाहलातून आपल्याला काय मिळतंय? फक्त आवाज, ध्वनी. आत पोचणारं असं काहीच नाही. मोठ्या आवाजातली गाणी, सिने तारकांबरोबर आरत्या, झगमगाट, नृत्ये, टी.व्ही वर कव्हरेज ही खरी भक्ती नव्हे हे आपल्या प्रत्येकाला माहित्ये. एका प्रसिद्ध देवाच्या पायाशी एक क्षण डोकं ठेवू इच्छिणाऱ्या भक्तांना उद्दामपणे ढकलणारे कार्यकर्ते पाहून तर हद्दच झाली. अरे काय चाललंय काय? आणि लोकं सहन का आणि कसं करतायत? इतर कुठल्याही प्रगत देशात, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सारख्या विविध सणांमुळे नागरिकांचं सामान्य जनजीवन विस्कळीत होत नसेल. प्रगतीचं एक पाऊल पुढे टाकत असताना, दोन पावले आपण अशी मागे का येतोय?

देवदेखील हा कोलाहल बघून, मोठ-मोठ्या मूर्तींमध्ये वसत नाही हे का कळत नाही लोकांना. देवाची भक्ती ही फक्त आपल्या मनात शांतपणे एका क्षणात देखील होते. देवाला बघायला खरं तर कुठेही जावं लागत नाही. तो आपल्याला आपल्या मनात भेटू शकतो. अगदी शांतपणे. 



मग या कोलाहलातून बाहेर पडून आपण सगळे शांत कधी होणार आहोत?




2 comments:

  1. Completely agree. Every thinking soul, who thinks that s/he believes in God, should do some thinking on what his/her definition of God is and how he/she wants to pursue that faith. The general observation is that, people just go with the flow without doing any thinking and applying rationality. And hence they find God in big pendals/temples with thousands flocking together and not within themselves in a peaceful corner of their home.

    ReplyDelete
  2. अगदी खरे आहे. मुंबई मधे गणपतीचा असलाच तर एकच फायदा. रस्त्यातील खड्डे बुजवले जातात. गणपतीच्या आधि या खड्ड्यांवरुन स्वताला नेते समजणारी ढोंगी मंडळी मिळेल त्या चँनेल वरुन कंठशोष करीत बाप्पाची काळजी आपल्यालाच कशी आहे हे दाखवण्याचा खटाटोप करीत असतात. म्हणजे कर भरणारे नागरीक ३५० दिवस हाडे खिळखीळी करुन घेत या खड्ड्यांतून जात असतात त्याचे याना सोयरसुतक नाहि पण यांच्या मूर्ती मात्र गुळगुळीत रस्त्यावरुन जायला हव्यात.

    दिड-दोन हजार कोटिच्या या "धंद्या"पुढे तुमच्या आमच्या त्रासाला विचारतो कोण?

    ReplyDelete

आपले मत जरूर मांडा.... :-)