तो शांत आहे. अगदी स्तब्ध.
मी बाहेरच्या व्हरांड्यातून त्याच्याकडे पाहिलं.
पावसाळी हवेने सूर्याला आपल्या पडद्याआड ठेवलंय. सकाळचे सहाच वाजलेत.
पण सूर्य याहून वर येईलसं वाटत नाहीये. ढग येउच देणार नाहीत त्याला. मला हे असंच
आवडतंय. पावसाळी, सर्द.
व्हरांड्यातून दिसतायत ती लांबवर
पसरलेली शेतं. ताज्या हिरव्या रंगाची.
एखादाच शेतकरी वाकून काहीतरी काम करताना दिसतोय.
दूर अंतरावर एक रस्तादेखील आहे. तो स्पष्ट दिसत नाही.
पण या हिरवाईच्या भांगातून जाणारा लाल एस.टी.चा कुंकवासारखा ठिपका
दिसतो.
तो शांत आहे. अगदी स्तब्ध.
एक छोटंसं काळ पाखरू दिसतंय. छोटेसे पंख फडाफडा मारत ते वरवर उडतं.
त्याच्याकडे पाहून वाटतं की खरं तर फार उंच जाणं याला झेपणार नाहीये.
पण ते बऱ्यापैकी उडतं. आणि मग अलगद खाली येतं. मधेच त्याला त्याचा एक
सवंगडी भेटतो.
दोन काळी पाने झाडावरून सुटून खाली पडावीत तशी ही दोन पाखरे आरामात
खाली येतात.
पंखांना आराम देत. आपली आपण. हवेबरोबर.
पण जमिनीच्या वर एका क्षणी परत ती जिवंत होतात आणि मग पंख फडफडवत एकत्र
नाहीशी होतात.
वारा गायब आहे. एकही पान हलत नाही. म्हटलं नं,
तो शांत आहे. अगदी स्तब्ध.
माझ्या अचानक लक्षात आलंय. मी लिहिलेलं सगळं डोळ्यांनी आत घेतलंय.
मी विचार करत नाहीये. मीसुद्धा शांत आहे.
मन शांत आहे. डोकं शांत आहे. मला कळतंय की माझ्या डोक्यात आणि मनात
कसलाही विचार नाहीये बराच वेळ.
मी फक्त पहात्ये. मला दिसतंय.
मला असं वाटू लागलंय की हा जो समोर दिसणारा शांत आणि स्तब्ध निसर्ग
आहे तो ही मला तसच बघतोय जशी मी त्याला. आम्ही एकमेकांना बघतोय. आम्ही दोघेच आहोत.
समोरासमोर.
आम्हा दोघांमध्ये ही शांतता आहे. ऐकू येणारी. दिसणारी. जाणवणारी.
फक्त माझं शरीर तिथे उभं आहे. डोळे बघतायत.
तो शांत आहे. अगदी स्तब्ध.
त्यानेच ही शांतता मला दिलीये.
इतकी की माझ्यासाठी विचारदेखील तोच करतोय.
त्यामुळे मी ही शांत आहे. अगदी स्तब्ध!


खूप छान !
ReplyDeleteaabhar!
Deletenice...this silence speaks so much...
ReplyDeleteYour words have the capacity to express stillness and silence...Wonderful:)
ReplyDeleteGituuuuuu ..... aga to silence ani TU! bus, ya donach goshti hotya tuzya ghari....masta! lots of love!
Delete