अरे मार्क, तू बरा आहेस नं?
तू वेडा असणार. असणार नाहीस, आहेस! एक
अतिहुशार वेडा. कमाल करून टाकलीयेस तू आमच्या आयुष्यात. गुंतवून टाकलं आहेस आम्हांला. कोण कुठचा तू. कोण कुठचे आम्ही. पण आम्हांला एकमेकांशी तू जोडून टाकलंस. या तुझ्या फेसबुकच्या जाळ्यात किती अलगद अडकलो आम्ही. आणि नावं ठेवता ठेवता का होईना पण आवडतंय आम्हांला हे जाळं. तू आमच्यावर टाकलेलं!
सॉरी हं म्हणजे मला तुझं कौतुक खूप उशीरा वाटतंय हे मान्य आहे. तू फेसबुकला जन्म
देऊन जवळ जवळ १० वर्षे झालीयेत. २००३-४ मधे सुरु झालेली ही जनसंपर्काची वेबसाईट
आता इतकी म्हणजे इतकी सर्वमान्य झालीये की बहुतेकांचं त्याशिवाय जगणं मुश्कील
झालंय. स्वतःच्या चेहेर्यापेक्षा लोकं तुझ्या या बुकचा फेस जास्त पहातायत. किती जणांच्या
यामुळे गाठीभेटी झाल्यात, किती जणांनी एकमेकांचे फोटो घरच्या घरी बसून पाहिलेत त्याला
काही मर्यादा नाही. म्हणजे “तुमच्या मुलीच्या लग्नाचा अल्बम पहायला येतो” वगैरे
म्हणण्याची सोयच उरली नाहीये. कारण लग्न लागता लागता फोटो कुठे न कुठे अपलोड होतात.
त्यावर हजारो लाईक्स येतात. आणि फेसबुकवरून लग्नाचे फोटो अक्षरशः घरोघरी पोचतात.
फेसबुकवर काय काय घडत नाही? इथे खेळ आहेत. इथे मतप्रदर्शन होतं. इथे तुमच्या मनातलं
मित्रांपर्यंत पोचतं. आपल्या कामाचं मार्केटिंग होतं. नवनवीन बिझनेसच्या कल्पनाही
इथे सुचतात आणि मग फेसबुक पेजेस तयार होतात. इथे सेलेब्रिटीज पर्यंत त्यांचे चाहते
पोचतात. एरवी अशक्य वाटेल अशा लोकांशीही संवाद होऊ शकतो निदान आपल्या भावना व्यक्त
तरी होऊ शकतात. हे वेड आहे. खरंच वेड आहे. पण हेच आजचं सत्य आहे.
मला हा सगळा साक्षात्कार इतक्या उशीरा का झाला असं वाटेल
तुम्हांला. पण काय करणार? मी “द सोशल नेटवर्क” हा सिनेमा परवा म्हणजे उशिराच
पाहिला. त्यात, फेसबुकचा शोध युनिव्हर्सिटीत शिकत असतानाच लावणाऱ्या मार्क
झुकरबर्गला पाहिलं आणि कमालच वाटली मला त्याची. अरे किती लहान होतास तू तुला हे
सगळं सुचलं तेव्हा. फेसबुक चांगलं की वाईट हा मुद्दा वेगळा पण ही एक
संपर्कक्षेत्रातली क्रांती नक्कीच आहे. आणि ती या एका मुलाने आणि त्याच्या
मित्रांनी घडवून आणली हे मला तर फारच कौतुकास्पद वाटतंय. थोडक्यात, फेसबुक आणि मार्कचं कनेक्शन मला नव्याने जाणवलं या सिनेमामुळे. आणि म्हणून हा सगळा फेसबुकविषयी व्यक्त होण्याचा गडबडगुंडा.
प्रत्येक पिढीत अशी चमत्कार घडवणारी तरुण मंडळी निर्माण होतातच.
त्याचमुळे तर नव्या पिढीचं पाऊल जुन्या पिढीपेक्षा पुढे पडत असतं. तंत्रज्ञानाच्या
क्षेत्रात तर रोज काही न काही नवे शोध लागत असतात आणि ते आपलं जगणं अधिकाधिक सोपं
(?) बनवत असतात. पण फेसबुक ही अशी क्रांती आहे की तिने जगाला लपेटून घेतलंय आपल्यात.
मला आठवतं, ऑर्कुटशी तोंडओळख होई-होईपर्यंत फेसबुकचं वारं आलं होतं. मी तर जाम नाक
मुरडलं होतं. माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींशी संबंध ठेवायला मला फेसबुकची गरज
नाही वगैरे. अग हो बाई, तू नको येउस फेसबुकवर. पण जग तिथे पुढे चाललंय. आणि
जगाबरोबर नाही राहिलीस, नव्या तंत्रज्ञानाचा जाणीवपूर्वक, स्वतःसाठी योग्य पद्धतीने उपयोग नाही करून घेतलास तर तुच
मागे पडणार आहेस.
त्यावेळी अगदी नाखुशीने मी फेसबुकवर प्रोफाइल तयार केला. खरं तर मी नाहीच,
माझ्या एका मित्राने तयार करून दिला. तू करत असलेल्या कामांची माहिती
प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी कर उपयोग त्याचा म्हणून. नाखुशीने सुरु झालेल्या या
प्रोफाइलवर वेळ घालवण्याची मला अगदी हळू हळू पण चटक लागलीच. कॅफे वर्ल्ड खेळता
खेळता बराच वेळ जाऊ लागला आणि मग एकदम लक्षात आलं की फेसबुक हे माध्यम कसं
वापरायचं हे प्रत्येकाने स्वतःपुरतं ठरवणं फार गरजेचं आहे. त्यावर किती वेळ
घालवायचा हे ठामपणे ठरवलं पाहिजे. जर योग्य पद्धतीने वापरलं तर यासारख उपयोगी माध्यम
दुसरं नाही. पण अविचाराने वापरलं तर वेळेचा अपव्यय खूप होऊ शकतो.
फेसबुकच्या जन्माची रोचक कहाणी सिनेमात पहाताना मला राहून राहून वाटत
होतं की २०-२२ वर्षांच्या मुलांनी हे कसलं जबरदस्त वादळ निर्माण केलं. तरुणांची आणि
नव्या जगाची गरज ओळखून त्यांनी जनसंपर्काची व्याख्याच बदलून टाकली. कदाचित त्या
वेळी त्यांना हे कळलंदेखील नसेल की आपण कशाला जन्म देतोय पण आज त्यांचं बाळ जगात
अगदी प्रत्येक घरात दुडूदुडू धावतंय म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. म्हणूनच आपले
फोटो, माहिती, आवडी-निवडी या सगळ्यासकट एक “social experience” अपलोड करावा ही
कल्पना ज्याला सुचली आणि अगदी कोवळ्या वयात ती प्रत्यक्षात आणणारा हा मार्क झुकरबर्ग माझ्यासारख्या
सामान्य मुलीला वेडा वाटणारच नं.
अरे हो, साबीर, तू चिडू नकोस. तुझा विसर नाही पडलाय मला. तू ही “हॉटमेल” ही इमेल क्रांती जन्माला घातलीस. तुझा आम्हांला अभिमान आहेच.
यांच्यासारखे आणखी खूप
असतील, आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कमाल करून दाखवली असेल, आहे. पण तरीही
ज्या वयात “मला आयुष्यात नेमकं काय करायचंय” हे मला तरी नीटसं माहित नव्हतं त्या
वयात या मार्कने संपूर्ण जगाची संवादाची भाषा बदलली आणि जग काबीज केलं याचं मला नव्याने खूप कौतुक वाटतंय. आज केवळ तरुणाई
नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील फेसबुक हे वेळ घालवायचं, संपर्कात रहाण्याचे
उत्तम साधन बनलं आहे.
भारतातला एखादा एकनाथ, अमेरिकेतला कोणी एक जॉर्ज, रशियातली स्वेतलाना,
चायनातली चिंग मी, फ्रान्समधला थिअरी या सर्वांची भाषा आज एक आहे आणि ते सगळे
एकमेकांशी “कनेक्टेड” आहेत ... फेसबुकमुळे!
म्हणूनच म्हटलं की अरे वेडा आहेस का तू
मार्क?
वाह एकदम भावुक होवून लिहिलस शर्वरी
ReplyDeleteफेसबुक whatsapp म्हणजे आजच्या काळाचा नारद आहे
क्षणात आपले म्हणणे आपल्या सर्वाना सांगायचे उत्तम माध्यम
नारद अशासाठी म्हटले कारण फेसबुक कोमेन्टमुळे पोलिस कारवाई पण झालेल्या आहेत
असो उत्तम लेख
असेच लिहित रहा
joshnilu.blogspot.in
:-)
Delete