Thursday, August 1, 2013

मुकं .... हिरवं!




“कोणीतरी त्याला जमिनीत रुजवलं. कदाचित वाऱ्याने कुठलं तरी बीज उडवून आणलं आणि ते मातीत पडून रुजलं.
पावसाच्या पाण्यावर ते मोठं झालं. लहान असताना छान निरागस हिरवंगार दिसायचं. अगदी कोवळा हिरवा रंग.
मग तो गडद होऊ लागला. मुळे पक्की झाली. खोड तयार झालं. आणि रोपट्याचं झाड झालं.
ते एरवी शांत असतं. पावसात झोडपलं जातं. उन्हात सुकल्यागत होतं. परत पावसात हिरवंगार होतं.
हे झाड कोणाचं आहे? कोण काळजी घेतं त्याची?”
मला झाडासारखं व्हायचंय.
पण मी शांत नाहीये. मला सतत काहीतरी दुखत-खुपत असतं. मला सारखं कोणीतरी काळजी घ्यायला हवंसं वाटतं.
अपेक्षा असतात. मी सारखं काहीतरी म्हणत असते. मला काही न काही हवं असतं. मी तक्रार करते. रडते. भांडते.



“कुंडीतल्या मातीकडे मी दिवसेंदिवस पहात असते. पाणी घालताना हिरवा रंग शोधत असते. तो कधी दिसेल ठाऊक नसतं. पण तरी रोज आशेने त्या मातीत पाणी जिरवत रहाते. दिवस लोटतात, कधी महिने. मग ध्यानी मनी नसताना अचानक तो कोंब दिसतो. मातीचं छोटं छप्पर डोक्यावर घेऊन उभा असतो. मग एक नवा आनंदप्रवास सुरु होतो. त्या कोंबाचं रोपटं होतं. हसू-खेळू लागतं. फुलं येतात.”


 
माझ्या खिडकीतली रोपटी किती शांत असतात. रात्रभर पाऊस कोसळतो तेव्हा सकाळी ती झुकलेली, पावसाच्या माऱ्याने झोडपलेली दिसतात. मी त्यांच्याकडे पहाते. ती मला काहीच म्हणत नाहीत. ती तशीच असतात. उलट वारा आला की छान हलतात पानें. मला वाटलं तर मी त्यांना सावरते. नीट आधार देते. किंवा तसच ठेवते. ती काहीच म्हणत नाहीत यावर.

या झाडांचा मूकपणा मला सारखा जाणवतो. अरे काहीच कसं म्हणणं नसतं तुमचं? किती ही सहनशीलता?
सगळं कसं स्वीकारता तुम्ही शांतपणे? नाही कोणी पाणी दिलं, नाही जगता आलं तर आपली मरून जाता.
खरं तर मला वाटतं की खिडकीचा पडदा दूर होताच तुम्ही खूप बोललं पाहिजे माझ्याशी. सांगितलं पाहिजे मला की रात्री काय त्रास झाला. वाऱ्यामुळे फांद्या झुकल्या. किंवा ग्रीलवर आपटल्यामुळे लागलं वगैरे...पण तुम्ही काहीच सांगत नाही. माझ्यावर विश्वास ठेवता. मी समजून घेईन असं वाटतं तुम्हांला. नाही घेतलं तरी ते स्वीकारता तुम्ही. कमाल आहे तुमची.

“तुमची फुलं, पानं, तुमचा रंग मला सुख देतात. तुम्हांला वाढवण्यात आईपण मिळतं मला. तुम्हांला फुटलेले कोंब माझ्याही आयुष्यात आशा निर्माण करतात.”

तुम्ही फक्त देता. कसलीही अपेक्षा न करता.
शांतपणे! मग, कसं होता येणार मला झाड?





4 comments:

  1. apratim sharvari khupach sundar
    asahi durasth hovun vichar karata yeil ??
    asa kadhi vicharach navhata ala mannat

    ReplyDelete
  2. पालवी
    रोज ग्यालरित चकरा मारताना
    एक गोष्ट मन वेधून घेते
    निसर्गाच्या कुशितली एक वेल
    आमच्या घरात डोकावू पाहतेय

    उन पाउस असला तरी
    आहे मनाने खुपच खंबीर
    कधीतरी मी निराश झाल्यावर
    खचल्यावर देइ मला धीर

    म्हणते "इतकी तकलादू जरी मी
    आसमंतात झेपावु पाहतेय
    आणि तूच का असा खचतोस?
    उठ,जग ताठ मानेने"सांगू पाहतेय

    त्याच वेलीवर आज नविन नजाकत आली
    आणि ती नाजुक वेल अजुनच सुन्दर झाली
    वेलीवर दिसू लागलीय नविन हिरवी पालवी
    अस्वस्थेतहि देइ दिलासा आणि निराशा घालवी

    मनाला देते उभारी वेल मला खंबीर बनवतेय
    मला शिष्य बनवुन स्वतः गुरुपण घेतेय
    भिंतीवर आधार नसताना स्वबळावर वाढतेय
    आहे त्यात जमवून घे हे मला शिकवतेय

    -- निलेश जोशी

    ReplyDelete
  3. सर्वांचे आभार.....कविता छान आहे!

    ReplyDelete

आपले मत जरूर मांडा.... :-)