Thursday, September 4, 2014

आगंतुक!

अचानक एक दिवस माझ्या लक्षात आलं की माझ्या खिडकीत  मी न लावलेली अनेक झाडं आलीयेत. म्हणजे अक्षरशः बहरली आहेत. कसं काय? अर्थात याला वैज्ञानिक कारण आहे हे मला माहित आहे...शाळेत शिकलोय आपण ते....परागकण वाऱ्यामुळे उडून इतर ठिकाणी रुजतात  वगैरे...करेक्ट. पण मला असा विचार करायचा नाहीये. मला अर्थ लावायचा आहे .. किंवा शोधायचा आहे.

त्याला कारण आहे तसं.

मी सुद्धा  काही रोपं लावली होती. काही बिया आणि काही नाजूक रोपं. त्यांची खूप काळजी घेत होते मी. अगदी रोज उठून निगा राखत होते. अनेक महिने मी सतत बघत होते की बिया रुजतायत का? कोंब कधी फुटणार? पण मातीशिवाय काहीच दिसत नव्हतं. अगदी मनापासून हवं असलेलं एक रोपही लावलं होतं. गवती चहाचं. ते मोठं होईल आणि मग मी त्याचीच पानं घालून मस्तपैकी चहा पिईन असं ठरवलं होतं. ते उत्तम वाढण्यासाठी काही अटी होत्या. भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे. पाणी खूप जास्त घालायचं नाही इत्यादी. मी माझ्या परीने निगुतीने प्रयत्न केला. पण ते नाजूक रोप काही जगलं नाही. काही बिया रुजल्या नाहीत त्या नाहीतच. म्हटलं आपण काय बरं करणार? मातीच्या खाली जाऊन कसं बघणार की यांचं काय बिनसलं? 

कोणीतरी एका दुकानात सहज म्हणून दिलेली गोकर्णची वेल मी लावली होती. ती थोडी वाढली आणि मग सुकून गेली. का बरं? मग लक्षात आलं की काहीतरी कीड होती बहुदा त्यामुळे ती वाढू शकली नाही.
माझी बाकी काही रोपं मात्र छान वाढत होती. सदाफुलीला रोज एक फूल येत होतं. तुळस छान बहरत होती. मनीप्लांट पण उत्तम वाढत होतं. पण ही काही रोपं मात्र खूप काळजी घेऊनही आणि खूप आशा लावूनही रुजली नाहीत, वाढली नाहीत, बहरली नाहीत. ती गेलीच. सुकली. मग मुळापासून उपटून फेकून देण्यापलीकडे काही पर्याय नव्हता. तेच केलं. करावं लागलं. आता ती समोर नाहीत. त्यामुळे वाईट वाटत नाही. पण आपण जो वेळ दिला तो फुकट गेला असं कधी मधी वाटतंच. आणि वेळ म्हणजे नुसता वेळ नाही तर त्यातली मानसिक गुंतवणूक. असो. 

म्हणूनच जेव्हा हे आगंतुक पाहुणे खिडकीत बहरलेले दिसले तेव्हा वाटलं की हे कुठून आले? माझ्या नकळत  माझ्या दारात त्यांनी रुजण्याचं काय कारण आहे? एका वेगळ्याच कुंडीतून जेव्हा गोकर्ण उगवली आणि बहरली तेव्हा वाटलं की हिला नव्हती का गरज माझ्या लक्ष असण्याची? मी पाणी घालण्याची? किंवा सूर्यप्रकाश मिळावा म्हणून कुंडी हलवून ठेवण्याची? ही वेल कशी आणि का आपण होऊन इथे उगवली? आणि दिसते तर इतकी सुंदर की रोज सकाळी खूप हिरवागार, हलणाऱ्या पानांचा आनंद मिळतो. हे न मागितलेलं कसं काय मिळालं मला इतक्या सहज? मी काही न करता. माझ्या खिडकीभर पसरलेली ती वेल  पाहून मला खरंच रोज आश्चर्य वाटतं.....किती सुंदर वेल....स्वतःहूनच तिच्या इतक्या फांद्या पसरल्या आहेत. किती मस्त वाटतं मला जेव्हा मला ती रोज दिसते. मग मी बिया पेरल्या होत्या तेव्हा तू अशी येऊन का गेलीस? का नाही वाटलं तुला तेव्हा बहरावंसं?

मग मी आता काय समजायचं यातून? की सहज मिळालेलं घ्यावं आणि आनंदी व्हावं. की काही मिळावं म्हणून फार मागे लागू नये. मग ते मिळणार नाही कदाचित. की अती तेथे माती?
म्हणजे हवं ते मिळेल याची खात्री नाहीच. नको ते मिळू शकेल. पण मग ते मुळात हवं होतं का नाही याला काही अर्थ नाही. ते अचानक मिळालं म्हणून आनंदी व्हा. हं...असंच काहीतरी बहुदा. नाही अजून नीटसं कळलेलं मला. 

नकळत उगवलेली वेल मात्र मला रोज दिसत्ये. ती वाऱ्यावर छान डोलत्ये. भरपूर वाढत्ये. देव जाणे मला काय सांगत्ये. 

आणि मी अजिबात वाट बघत नाहीये त्यावर सुंदर फूल कधी उगवेल याची!!






5 comments:

  1. चैतान्याला नियम नसतात
    आणि मन हे तर चैतन्याचं प्रतीकच !

    ReplyDelete
  2. कधी कधी अचानक "अगांतुक" म्हणून समोर येणारे सुद्धा आनंद देतेच की. हवी हवीशी वाटणारी "गोकर्ण" ती कशी आणि कुठून आली या पेक्षा ती आपल्या समोर बहरतेय हे महत्वाच नाही का? मला वाटत कि वृक्ष वेलींच सुद्धा माणसांच्या "नात्यांप्रमाणे" असते. जे नैसर्गिकरीत्या रुजते तेच बहरते.

    ReplyDelete
  3. खरंय आणि मला मान्य आहे ते पण मग नाती निर्माण करण्यासाटी प्रयत्न करूच नयेत का? असं वाटलं. जे प्रयत्न करून आणि वाट पाहून मिळालं नाही ते इतक्या सहज कसं रुजलं आणि बहरलं याचंच आश्चर्य वाटलं. आनंद आहेच. खूप. :-)

    ReplyDelete
  4. मान्य. पण प्रयत्न करू नयेत असे मात्र मला सुचवायचे नव्हते. पण कधी कधी प्रयत्न करूनही मिळत नाही म्हणून निराश होऊ नये.
    प्रयत्न करून आणि वाट पाहून मिळालं नाही ते जेंव्हा सहज मिळते तेंव्हा आश्चर्य वाटणे स्वाभाविअक आहे. आणि त्यावेळचा आनंद तर दुप्पट असतो. तो आपलयाला अनुभवायला मिळाला याचा मलाही आनंद आहे. असो. हा आणि इंग्रजी blog छान आहेत. इंग्रजी blog वरील short story *Ole ole..) विशेष आवडली. एक छान short film होऊ शकेल. विचार करावा.

    ReplyDelete

आपले मत जरूर मांडा.... :-)