Saturday, January 11, 2014

जुनं आणि नवं...!




गेल्या वर्षाच्या शेवटी शेवटी मला इतकी नवी आणि जुनी माणसे भेटली. खरं तर अख्खं वर्षं मी काही एक-दोन  गोष्टी घडतील किंवा घडाव्यात अशी वाट पहाण्यात घालवलं. बाकी सगळं विसरून तेव्हढाच विचार करत होते. पण गंमत म्हणजे तेव्हढंच, हवं तेच फक्त घडलं नाही. पण नजर वेगळीकडे वळवली आणि लक्षात आलं की इतर खूप वेगळ्या, छान  गोष्टी घडल्या आणि मग मनाला आनंद वाटायला लागला. आनंद वाटून घेणं, मानण शेवटी आपल्याच हातात असतं की. लहानपणीच्या, शाळेतल्या जुन्या मैत्रिणी भेटल्या. त्या आपल्या आयुष्यातलं काहीतरी चांगलं घडलेलं इथे इंडियात साजरं करायला आल्या होत्या. माझ्या बहिणीच्या जुन्या ऑफिसमधल्या आणि वयाने थोडया मोठ्या मैत्रिणी भेटल्या आणि परत लहान झाल्यासारखं वाटलं. भाच्याच्या मुंजीच्या निमित्ताने मामेबहिण आणि बाकी नातेवाईक भेटले. अनेकांची लग्ने झाली आणि त्याचे आनंदसोहळे झाले. नवीन कामांमुळे नवी मंडळी भेटली, नवे ग्रुप्स झाले. खूप म्हणजे खूपच भेटी-गाठी झाल्या. आपल्या मनासारखं घडलं नाही की आपण खट्टू होतो. त्या परिस्थितीत आपण एकटे आहोत असं वाटतं कारण ते आपलं एकट्याचं हरणं असतं. आपल्यापुरतं मर्यादित. संपूर्ण जगाच्या तुलनेत ते नेहेमीच छोटूसं असतं. पण आपण केलं तर आपल्यासाठी खूप मोठं. मला असं एकटे आणि निराश वाटू नये म्हणूनच त्या अज्ञात शक्तीने इतकी सगळी आवडती माणसे मला भेटायला इकडून तिकडून, विविध निमित्तानी जवळ आणली असं मानायला मला फार आवडतंय. ते खरंच आहे. मनासारखं न घडलेलं मागे सारून मी हे वर्षं शांतपणे संपवलंय आणि नव्या वर्षांत अगदी सहज प्रवेश केलाय. “जे आहे ते आहे” हे स्वीकारायला मी शिकले की काय? अरे देवा! :-)
 
गेल्या वर्षांच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये मी नव्या गोष्टी आयुष्यात आणल्या, आपल्यातलं पोटेन्शियल जितकं वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल तितकं वापरण्यासाठी संधी निर्माण केल्या. त्यातूनच मी “छापा काटा” या मराठी नाटकाची फेसबुक पब्लिसिटी करण्याचं काम करायला घेतलं. पृथ्वीला हिंदी नाटके करताना आम्ही खूप वेगवेगळे व्हिडीयोज बनवायचो. पोस्टर्स रंगवायचो. जे काही क्रियेटीव्ह व्हायचं ते फेसबुकवरच्या आमच्या नाटकाच्या पेजवर जायचं. यातून सर्वांची क्रियेटीव्ह शक्ती तर कामाला यायचीच पण त्यामुळे नाटक खूप लोकांच्या नजरेला आलं. पाहिलं गेलं. हेच जर मराठी नाटकांसाठी केलं तर खूप फायदा होईल असं वाटलं कारण मराठी नाटकाला मुळात खूप प्रेक्षक असतोच पण त्यात तरुणांची भर घालायची असेल तर आजचं साधन म्हणजे सोशल मिडियाच आहे. ही आजच्या काळाची गरज मुक्ता बर्वे आणि दिनू पेडणेकर या निर्मात्यांनी ओळखली आणि या कामाला महत्त्व दिलं त्यासाठी त्यांचे आभार. छापा काटाचं फेसबुक पेज सजवण्यात आणि त्यासाठी एक केंपेन करण्याच्या निमित्ताने मी खूप शिकले. छोटे छोटे व्हिडीयोज शूट करून ते एडीट करायला शिकले. मला वाटतं की मराठी नाटकाचं असं पेज ज्यात व्हिडीयोजच्या माध्यमातून संवाद साधला गेलाय असं पहिल्यांदाच झालं असावं. टेक्नोलोजीमधे अप टू डेट राहणं हे फार महत्वाचं आहे हे नेहेमी वाटायचं आणि कळायचं पण ती खऱ्या अर्थाने शिकून तिचा उत्तम उपयोग करायला मी छापा काटामुळे शिकले. त्याचं खूप समाधान गेल्या वर्षाच्या शेवटी मिळालं आणि आजही मिळतंय. छापा काटाच पेज ३००० हून जास्त लोकांपर्यंत पोचलंय(लाईकस्).

गीतांजली कुलकर्णीबरोबर वाडा तालुक्यात तिथल्या तरुण मुला-मुलींसाठी 
सहाय्यकाच्या भूमिकेत राहून शिबीर घेतलं. तिथल्या मुलांची अभिनयाशी ओळख व्हावी हा मुख्य उद्देश असला तरी त्याचबरोबर त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी याचा किती उपयोग होतोय हे लक्षात आलं. गीतांजलीने यापूर्वीच सोनाळा गावातील छोटया मुलांना शाळा शिकवणाऱ्या तरुण मुला-मुलींवर खूप काम केलंय. यातले काहीजण या शिबिरातही होते. इतरांच्या तुलनेत त्यांना किती आत्मविश्वास आहे स्वतःबद्दल हे अगदी स्वच्छपणे दिसून आलं. माझ्या या मैत्रिणीचं खूप कौतुकही वाटलं. हा उपक्रम नव्या वर्षांत आम्ही सुरु ठेवणार आहोत. खूप नवीन कल्पनांवर काम करतोय. फेसबुक पेजदेखील करूच ज्यामुळे अनेकांपर्यंत हा उपक्रम पोहोचेल. तिथल्या मुलांचा नियमितपणे नाटक करणारा ग्रुप तयार होऊ शकला तर हा उपक्रम यशस्वी होईल पण नाहीच तरी त्या मुलांना एक वेगळा दृष्टीकोन मिळेल आयुष्याकडे पाहण्याचा हे नक्की.

लेखन हा माझा अत्यंत आवडीचा विषय. त्याही क्षेत्रात नव्या दिशेने छोटी छोटी पावले टाकायला गेल्याच वर्षाच्या शेवटी शेवटी सुरुवात केली. या छोटया पावलांनी मोठं अंतर पार केलं की आणि तरच त्याबद्दल लिहीन....कदाचित आणि होपफुली या वर्षाच्या शेवटी शेवटी!

एकूण नव्या वर्षाचा संकल्प वगैरे काही नाही. या वर्षी इतकंच ठरवलंय की प्रत्येक दिवस जगत, अनुभवत पुढे जाऊया, वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आघाडयांवर. त्यामुळे काय होईल की मनासारखं असं काही योजलेलं नसेल. त्यामुळे घडणारी प्रत्येक गोष्ट ही नवीच असेल. अपेक्षित नसेल त्यामुळे स्वीकारली जाईल किंवा विसरली जाईल. “नवे स्वप्न, नव्या आशा, नवीन सरप्राईजेस” या आणि अशासारख्या intangible शब्दांना आणि भावनांना या वर्षी माझ्याकडून काहीही मिळणार नाहीये. सॉरी, टाटा.

२०१४ कडून कुठलीही अपेक्षा न ठेवता, फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवत मी वाटचाल सुरुही केलीये. आणि खरंच फार छान वाटतंय....मोकळं मोकळं, निरभ्र आणि तजेलदार!

3 comments:

  1. गावातील मुलांसाठी शिबीर घेण्याची कल्पना खूपच छान. अभिनंदन आणि शुभेच्छा.
    मराठी नाटकांनी Social Media वापरण्यास सुरवात केली हे उत्तम झाले. ती काळाची गरज तर आहेच पण आर्थिक दृष्ट्या परवडणारे आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे. Social Media Optimization (SMO) मुळे प्रचंड फरक पडू शकतो. एक विनंती इतकीच कि ३००० Likes वरून ३०००० Likes लवकरात लवकर होतील याचा प्रयत्न केला तर नाटकाचे ३०० प्रयोग नक्की.
    नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लिखाणाच्या क्षेत्रातील छोटी पावले लवकरच धावायला लागतील हि खात्री आहेच.

    ReplyDelete
  2. तुम्ही छान लिहिता... पुढील लिखाणाबद्दल मनापासून शुभेच्छा

    ReplyDelete

आपले मत जरूर मांडा.... :-)