Sunday, November 24, 2013

प्लीज...



अरे हे काय चाललंय आपलं? आपण वाहन जबाबदारीने चालवणं का थांबवलंय?
कुठे पोचायचं असतं आपल्याला या अशा पद्धतीने गाडया आणि मोटार सायकली चालवून?
किती उदाहरणे देऊ लोक वेगवेगळ्या प्रकारे गाडी अत्यंत बेजबाबदार होऊन कशी चालवतात याची?

मोटार सायकलवाल्यांसाठी सिग्नल नसतात असं कुठे कोणी जाहीर केलंय का? म्हणजे असा काही कायदा मंजूर झालाय की काय? कारण लाल रंगाच्या सिग्नलला हल्ली बाईक्स चालवणारे अजिबात जुमानेनासे झाले आहेत. केव्हढी हिम्मत असते त्यांच्यात लाल सिग्नल बघूनही सरळ पुढे निघून जाताना. बरं, यात आपण कायदा पाळण्याची वगैरे फालतू सामाजिक जबाबदारी धुडकावून देतोय हा आविर्भाव (माज हा अधिक योग्य शब्द) असणारच पण तो कोणाला दाखवतोय आपण? हा माज दाखवताना, अत्यंत बेपर्वाईने आपल्या बाईक्स चालवताना आपल्याच जीवाला धोका आहे हे समजत नसेलच नं या मित्रांना? आपण घराबाहेर पडतो तेव्हा आई नेहेमी सांगते की नीट जा रे...हळू चालव बाईक. याला जगातलं कुठलंच घर अपवाद असू नये. पण मग या आईला काही कल्पना नसेलच नं असले बावळटासारखे प्रेमळ सल्ले देताना की आपलं बाळ आता खूप मोठं आणि जबाबदार (?) झालंय. त्याला आपण काही सांगून कळणार नाही. ते आपल्याला हवी तशीच बाईक चालवणार. सिग्नल धुडकावून, किंवा गाड्यांच्या डाव्या बाजूने सर्रास बाईक पळवत जाणारे, तारुण्याची नशा चढलेले, क्षणोक्षणी मृत्यूशी खेळणारे आणि आपल्यामुळे इतरांनाही खेळवणारे हे आपले बाळ पाहून या माउलीच्या काळजाचा ठोका चुकायचाच खरं तर. पण घरी बसून हे काही दिसत नसल्यामुळे एक तर “दृष्टीआड सृष्टी” असं म्हणणे किंवा पोरावर भाबडा विश्वास ठेवणे यापेक्षा फार काही करू शकणार नाहीच ती बिचारी.

हे झालं मोटार सायकलवाल्यांच. गाडी हाकणारे तसेच. एक तर नियम माहितीच नसणार किंवा सिग्नल तोडण्यासाठी असतात, गाड्या कुठेही पार्क केल्या तरी चालतात मग बाकीच्यांचा खोळंबा झाला, गैरसोय झाली तरी चालतंय ही बेफिकिरी. त्यात “एकाने गाय मारली तर मी वासरू का मारू नये” हा दृष्टीकोनही असतो. परवा लोणावळ्याहून एक्सप्रेस हायवेवरून येताना मधल्या स्लो लेनमधून जाऊ लागले तर अक्षरशः उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंनी वेगाने गाड्या पुढे जाऊ लागल्या. मी हबकून गेले. ओव्हरटेक उजवीकडून करायचं असतं हा ही नियम मोडीत निघालाय. शेवटी मी तिसऱ्या लेनचा आधार घेतला. इथे निदान डावीकडून वाहन वेगाने येणं तरी टळेल.

खरंच खूप संताप होतोय माझा. रोज गाडी चालवताना हे असं बेशिस्त ड्रायव्हिंग पाहिलं की वाटतं कधी झालं हे असं सगळं? इतकं बेधडक? छोटया लेनमधून मोठ्या मार्गावर येताना जरा थांबून अंदाज घेऊन यायचं हे भान नाही. सरळ आपलं भसकन मुख्य रस्त्याला लागायचं. मग मुख्य रस्त्यावर वेगात येणाऱ्या गाड्यांना कसं कळणार तुम्ही कुठच्या क्षणी घुसणार ते? 
बर, सिग्नलला (पोलीस दिसतायत म्हणून) थांबताना झेब्रा क्रॉसिंगच्या इतक्या पुढे गाडया नेतात की ज्यांना हिरवा सिग्नल मिळालाय त्यांनाही जायला जागा मिळू नये.
आजच शिवाजी पार्कजवळ एका नो एन्ट्री चा बोर्ड ढळढळीत दिसत असलेल्या गल्लीत एक महाकाय गाडी सरळ समोरून येणाऱ्या उलटया ट्राफिकला न जुमानता घुसली. कमाल वाटली मला. मस्तच चाललंय की सगळ्याचं. येणाऱ्या भविष्यकाळात भर रहदारीच्या रस्त्यात मधेच गाडी आहे तशी उभी करून आपली कामें करून येणारी माणसेही निर्माण होतील आणि आपणही या कुठेही उभ्या केलेल्या गाडयांना वळसे घालत पुढे जात राहू.

मनाची सुद्धा सोडल्यानंतर काय होणार दुसरं?

आज प्रत्येकाला खरं तर मनोमन हे माहित्ये की हे वागणं चुकीचं आहे, जीवावर बेतणारे आहे पण काही सुजाण नागरिक सोडले तर कोणी या बाबतीत सुधारायचं नावच घेत नाहीये. यात दोष कोणाचा वगैरे मुद्द्यांमध्ये शिरायचंच नाही मला कारण गाठ आपल्या जीवाशी आहे इतकं पुरेसं नाही का? परदेशात वाहन परवाना देताना कडक नियम असतात आणि सहजासहजी परवाना मिळतही नाही. आपल्या इथलं काय बोलावं? इथे किती गंभीरपणे आणि काय परीक्षा होतात सर्वांना माहित्ये.

कुठलाही नियम केला की मुळात आधी त्यातून पळवाट कशी काढायची हेच शोधण्याची मानसिकता झालेली आहे आपली. आपण जशी सार्वजनिक स्वच्छता पाळूच शकत नाही तसच कुठलेही नियमही पाळूच शकत नाही हे दुर्दैव नाही तर आपण स्वतःहून अंगिकारलेलं सामाजिक सत्य आहे. सगळं आपल्याच हातात आहे खरं तर पण आपण मनावर घेत नाही. 

काय करुया? जरा पुन्हा एकदा (किंवा बहुदा पहिल्यांदाच) सगळे नियम तरी नीट माहित करून घेऊया का? प्लीज? रोज रोज आपल्या आणि इतरांच्या जीवाशी नको खेळूया. कुठे पोचायला झाला थोडा उशीर तर चालेल पण सिग्नल पाळूया. ही जबाबदारी घेण्यात आता उशीर करून चालणार नाही.

2 comments:

  1. Our country totally lacks self discipline ... whatever you have written is true.

    ReplyDelete
  2. पूर्णपणे खरे आहे. आणि नियम माहित नसायला काय झाले? Driving School मध्ये driving शिकवण्याच्या आधी नियमांची नीट माहिती करून दिली जाते. तसे बंधनकारक आहे. अर्थात हाही नियम मोडणाऱ्या driving schools आहेतच.
    बरे driving शिकून झाल्यावर नियम सांगणारी पुस्तके जवळपास नाहीतच. कि जी अधून मधून चाळून नियम नीट लक्षात राहतील. WIAA (वेस्टर्न इंडिया ओटोमोबाईल असोसिएशन) सारख्या संस्था आहेत safe driving चे धडे देणाऱ्या पण या संस्थेची माहिती अर्धा टक्के driving license holders ना तरी आहे का? हि माहिती खरे तर RTO ने license देताना द्यायला हवी. कारण WIAA च्या मेंबरशिपचे इतरही बरेच फायदे आहेत.
    अमेरिकेत बहुतेक राज्यात driving चे नियम आणि "Do & Don't" सांगणारी पुस्तके त्यांच्या DMV (Dept. Of Motor Vehicle) च्या ऑफिसात फुकट मिळतात.
    शेवटी एकच वाटते कि अमेरिके सारख्या देशात चार चाकी वाहन हि गरज असते ते आपल्याकडे अजून तरी ती गरजेपेक्षा चैन आहे. म्हणूनच बहुदा चैनीबरोबर येणारा माज आपोआप येत असावा.

    ReplyDelete

आपले मत जरूर मांडा.... :-)