Wednesday, August 28, 2013

तो.



तो शांत आहे. अगदी स्तब्ध.
मी बाहेरच्या व्हरांड्यातून त्याच्याकडे पाहिलं.
पावसाळी हवेने सूर्याला आपल्या पडद्याआड ठेवलंय. सकाळचे सहाच वाजलेत. पण सूर्य याहून वर येईलसं वाटत नाहीये. ढग येउच देणार नाहीत त्याला. मला हे असंच आवडतंय. पावसाळी, सर्द.
व्हरांड्यातून  दिसतायत ती लांबवर पसरलेली शेतं. ताज्या हिरव्या रंगाची.
एखादाच शेतकरी वाकून काहीतरी काम करताना दिसतोय.
दूर अंतरावर एक रस्तादेखील आहे. तो स्पष्ट दिसत नाही.
पण या हिरवाईच्या भांगातून जाणारा लाल एस.टी.चा कुंकवासारखा ठिपका दिसतो.
 








रस्ता दूर असला तरी एस.टी.चा आवाज ऐकू येतो. कारण मी म्हटलं नं,
तो शांत आहे. अगदी स्तब्ध.

एक छोटंसं काळ पाखरू दिसतंय. छोटेसे पंख फडाफडा मारत ते वरवर उडतं.
त्याच्याकडे पाहून वाटतं की खरं तर फार उंच जाणं याला झेपणार नाहीये.
पण ते बऱ्यापैकी उडतं. आणि मग अलगद खाली येतं. मधेच त्याला त्याचा एक सवंगडी भेटतो.
दोन काळी पाने झाडावरून सुटून खाली पडावीत तशी ही दोन पाखरे आरामात खाली येतात.
पंखांना आराम देत. आपली आपण. हवेबरोबर.
पण जमिनीच्या वर एका क्षणी परत ती जिवंत होतात आणि मग पंख फडफडवत एकत्र नाहीशी होतात.
वारा गायब आहे. एकही पान हलत नाही. म्हटलं नं,
तो शांत आहे. अगदी स्तब्ध.

माझ्या अचानक लक्षात आलंय. मी लिहिलेलं सगळं डोळ्यांनी आत घेतलंय.
मी विचार करत नाहीये. मीसुद्धा शांत आहे.
मन शांत आहे. डोकं शांत आहे. मला कळतंय की माझ्या डोक्यात आणि मनात कसलाही विचार नाहीये बराच वेळ.
मी फक्त पहात्ये. मला दिसतंय.
मला असं वाटू लागलंय की हा जो समोर दिसणारा शांत आणि स्तब्ध निसर्ग आहे तो ही मला तसच बघतोय जशी मी त्याला. आम्ही एकमेकांना बघतोय. आम्ही दोघेच आहोत. समोरासमोर.
आम्हा दोघांमध्ये ही शांतता आहे. ऐकू येणारी. दिसणारी. जाणवणारी.
फक्त माझं शरीर तिथे उभं आहे. डोळे बघतायत.
तो शांत आहे. अगदी स्तब्ध.
त्यानेच ही शांतता मला दिलीये.
इतकी की माझ्यासाठी विचारदेखील तोच करतोय.

त्यामुळे मी ही शांत आहे. अगदी स्तब्ध!


Friday, August 16, 2013

मनात खोल कुठेतरी...



मनात खोल कुठेतरी काहीतरी सारखं वाटतंय.
आणि ते काहीतरी उदासच आहे. काय करावं म्हणजे सूर्यकिरण दिसेल?
गेले अनेक महिने मी माझे सूर्यकिरण शोधून काढलेत.
हुडकून हुडकून.
छोटया छोटया गोष्टीत मला त्यांचा प्रकाश दिसलाय.
त्या प्रकाशाचा कवडसा आशेचा एक चौकोन देऊन गेलाय.
पण खराखुरा सूर्य कधी तळपणार आहे?

मला सरळ रेषेत चालताना पण इतकी धाप का लागत्ये?
दरी माझ्या मनात आहे. नागमोडी वळण मनात आहे.
रस्ता सरळच आहे बहुदा.
बापरे, तो एव्हढा मोठा डोंगर कधी चढू आता?

निरागसता मला फुलात दिसते.
पण फुलाचं आयुष्य किती?
असं काय आणि किती सहन करायला लागणार आहे त्याला?
ते उमलेल, हसेल आणि मग बंद होऊन जाईल.
काही विचार करायला त्याला कुठे वेळ मिळणार आहे.
पण माझं तसं नाहीये. मला असं मिटता येणार नाही.
मग निरागस राहून चालणार नाही का?
 
ढगाळलेलं आकाश मला आवडतं.
पाऊस तर फारच आवडतो.
पण तरी सूर्य हवाच आहे.
त्याचे किरण आणि पाऊस एकत्र व्हायला हवेत.

मनात खोल कुठेतरी काहीतरी सारखं वाटतंय.
आज ते काहीतरी छान आहे.
त्यात पावसाचा थेंब आहे. उन्हाचा कवडसा आहे.
वाऱ्याची गार झुळूक आहे.
आज तरी हे सगळं छान आहे.

मनाच्या तळाशी काहीतरी सारखं जे वाटतंय, ते वाट पाहणं आहे.
त्याचा नेम खरं तर चुकत नाही.
पण माझ्यासाठी मात्र तो विरळा का आहे?

त्याची मी अजून वाट पहात्ये.
त्याची मी सतत वाट पहात्ये. 
त्याच लख्ख सूर्याची मी आजही वाट पहात्ये.









Saturday, August 10, 2013

अरे मार्क....





अरे मार्क, तू बरा आहेस नं? 
तू वेडा असणार. असणार नाहीस, आहेस! एक अतिहुशार वेडा. कमाल करून टाकलीयेस तू आमच्या आयुष्यात. गुंतवून टाकलं आहेस आम्हांला. कोण कुठचा तू. कोण कुठचे आम्ही. पण आम्हांला एकमेकांशी तू जोडून टाकलंस. या तुझ्या फेसबुकच्या जाळ्यात किती अलगद अडकलो आम्ही. आणि नावं ठेवता ठेवता का होईना पण आवडतंय आम्हांला हे जाळं. तू आमच्यावर टाकलेलं!

सॉरी हं म्हणजे मला तुझं कौतुक खूप उशीरा वाटतंय हे मान्य आहे. तू फेसबुकला जन्म देऊन जवळ जवळ १० वर्षे झालीयेत. २००३-४ मधे सुरु झालेली ही जनसंपर्काची वेबसाईट आता इतकी म्हणजे इतकी सर्वमान्य झालीये की बहुतेकांचं त्याशिवाय जगणं मुश्कील झालंय. स्वतःच्या चेहेर्यापेक्षा लोकं तुझ्या या बुकचा फेस जास्त पहातायत. किती जणांच्या यामुळे गाठीभेटी झाल्यात, किती जणांनी एकमेकांचे फोटो घरच्या घरी बसून पाहिलेत त्याला काही मर्यादा नाही. म्हणजे “तुमच्या मुलीच्या लग्नाचा अल्बम पहायला येतो” वगैरे म्हणण्याची सोयच उरली नाहीये. कारण लग्न लागता लागता फोटो कुठे न कुठे अपलोड होतात. त्यावर हजारो लाईक्स येतात. आणि फेसबुकवरून लग्नाचे फोटो अक्षरशः घरोघरी पोचतात. फेसबुकवर काय काय घडत नाही? इथे खेळ आहेत. इथे मतप्रदर्शन होतं. इथे तुमच्या मनातलं मित्रांपर्यंत पोचतं. आपल्या कामाचं मार्केटिंग होतं. नवनवीन बिझनेसच्या कल्पनाही इथे सुचतात आणि मग फेसबुक पेजेस तयार होतात. इथे सेलेब्रिटीज पर्यंत त्यांचे चाहते पोचतात. एरवी अशक्य वाटेल अशा लोकांशीही संवाद होऊ शकतो निदान आपल्या भावना व्यक्त तरी होऊ शकतात. हे वेड आहे. खरंच वेड आहे. पण हेच आजचं सत्य आहे.

मला हा सगळा साक्षात्कार इतक्या उशीरा का झाला असं वाटेल तुम्हांला. पण काय करणार? मी “द सोशल नेटवर्क” हा सिनेमा परवा म्हणजे उशिराच पाहिला. त्यात, फेसबुकचा शोध युनिव्हर्सिटीत शिकत असतानाच लावणाऱ्या मार्क झुकरबर्गला पाहिलं आणि कमालच वाटली मला त्याची. अरे किती लहान होतास तू तुला हे सगळं सुचलं तेव्हा. फेसबुक चांगलं की वाईट हा मुद्दा वेगळा पण ही एक संपर्कक्षेत्रातली क्रांती नक्कीच आहे. आणि ती या एका मुलाने आणि त्याच्या मित्रांनी घडवून आणली हे मला तर फारच कौतुकास्पद वाटतंय. थोडक्यात, फेसबुक आणि मार्कचं कनेक्शन मला नव्याने जाणवलं या सिनेमामुळे. आणि म्हणून हा सगळा फेसबुकविषयी व्यक्त होण्याचा गडबडगुंडा.

प्रत्येक पिढीत अशी चमत्कार घडवणारी तरुण मंडळी निर्माण होतातच. त्याचमुळे तर नव्या पिढीचं पाऊल जुन्या पिढीपेक्षा पुढे पडत असतं. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर रोज काही न काही नवे शोध लागत असतात आणि ते आपलं जगणं अधिकाधिक सोपं (?) बनवत असतात. पण फेसबुक ही अशी क्रांती आहे की तिने जगाला लपेटून घेतलंय आपल्यात. मला आठवतं, ऑर्कुटशी तोंडओळख होई-होईपर्यंत फेसबुकचं वारं आलं होतं. मी तर जाम नाक मुरडलं होतं. माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींशी संबंध ठेवायला मला फेसबुकची गरज नाही वगैरे. अग हो बाई, तू नको येउस फेसबुकवर. पण जग तिथे पुढे चाललंय. आणि जगाबरोबर नाही राहिलीस, नव्या तंत्रज्ञानाचा जाणीवपूर्वक, स्वतःसाठी  योग्य पद्धतीने उपयोग नाही करून घेतलास तर तुच मागे पडणार आहेस. 

त्यावेळी अगदी नाखुशीने मी फेसबुकवर प्रोफाइल तयार केला. खरं तर मी नाहीच, माझ्या एका मित्राने तयार करून दिला. तू करत असलेल्या कामांची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी कर उपयोग त्याचा म्हणून. नाखुशीने सुरु झालेल्या या प्रोफाइलवर वेळ घालवण्याची मला अगदी हळू हळू पण चटक लागलीच. कॅफे वर्ल्ड खेळता खेळता बराच वेळ जाऊ लागला आणि मग एकदम लक्षात आलं की फेसबुक हे माध्यम कसं वापरायचं हे प्रत्येकाने स्वतःपुरतं ठरवणं फार गरजेचं आहे. त्यावर किती वेळ घालवायचा हे ठामपणे ठरवलं पाहिजे. जर योग्य पद्धतीने वापरलं तर यासारख उपयोगी माध्यम दुसरं नाही. पण अविचाराने वापरलं तर वेळेचा अपव्यय खूप होऊ शकतो. 

फेसबुकच्या जन्माची रोचक कहाणी सिनेमात पहाताना मला राहून राहून वाटत होतं की २०-२२ वर्षांच्या मुलांनी हे कसलं जबरदस्त वादळ निर्माण केलं. तरुणांची आणि नव्या जगाची गरज ओळखून त्यांनी जनसंपर्काची व्याख्याच बदलून टाकली. कदाचित त्या वेळी त्यांना हे कळलंदेखील नसेल की आपण कशाला जन्म देतोय पण आज त्यांचं बाळ जगात अगदी प्रत्येक घरात दुडूदुडू धावतंय म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. म्हणूनच आपले फोटो, माहिती, आवडी-निवडी या सगळ्यासकट एक “social experience” अपलोड करावा ही कल्पना ज्याला सुचली आणि अगदी कोवळ्या वयात ती प्रत्यक्षात आणणारा हा मार्क झुकरबर्ग माझ्यासारख्या सामान्य मुलीला वेडा वाटणारच नं.

अरे हो, साबीर, तू चिडू नकोस. तुझा विसर नाही पडलाय मला. तू ही “हॉटमेल” ही इमेल क्रांती जन्माला घातलीस. तुझा आम्हांला अभिमान आहेच.

यांच्यासारखे आणखी खूप असतील, आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कमाल करून दाखवली असेल, आहे. पण तरीही ज्या वयात “मला आयुष्यात नेमकं काय करायचंय” हे मला तरी नीटसं माहित नव्हतं त्या वयात या मार्कने संपूर्ण जगाची संवादाची भाषा बदलली आणि जग काबीज केलं याचं मला नव्याने खूप कौतुक वाटतंय. आज केवळ तरुणाई नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील फेसबुक हे वेळ घालवायचं, संपर्कात रहाण्याचे उत्तम साधन बनलं आहे.

भारतातला एखादा एकनाथ, अमेरिकेतला कोणी एक जॉर्ज, रशियातली स्वेतलाना, चायनातली चिंग मी, फ्रान्समधला थिअरी या सर्वांची भाषा आज एक आहे आणि ते सगळे एकमेकांशी “कनेक्टेड” आहेत ... फेसबुकमुळे! 

म्हणूनच म्हटलं की अरे वेडा आहेस का तू मार्क?

Thursday, August 1, 2013

मुकं .... हिरवं!




“कोणीतरी त्याला जमिनीत रुजवलं. कदाचित वाऱ्याने कुठलं तरी बीज उडवून आणलं आणि ते मातीत पडून रुजलं.
पावसाच्या पाण्यावर ते मोठं झालं. लहान असताना छान निरागस हिरवंगार दिसायचं. अगदी कोवळा हिरवा रंग.
मग तो गडद होऊ लागला. मुळे पक्की झाली. खोड तयार झालं. आणि रोपट्याचं झाड झालं.
ते एरवी शांत असतं. पावसात झोडपलं जातं. उन्हात सुकल्यागत होतं. परत पावसात हिरवंगार होतं.
हे झाड कोणाचं आहे? कोण काळजी घेतं त्याची?”
मला झाडासारखं व्हायचंय.
पण मी शांत नाहीये. मला सतत काहीतरी दुखत-खुपत असतं. मला सारखं कोणीतरी काळजी घ्यायला हवंसं वाटतं.
अपेक्षा असतात. मी सारखं काहीतरी म्हणत असते. मला काही न काही हवं असतं. मी तक्रार करते. रडते. भांडते.



“कुंडीतल्या मातीकडे मी दिवसेंदिवस पहात असते. पाणी घालताना हिरवा रंग शोधत असते. तो कधी दिसेल ठाऊक नसतं. पण तरी रोज आशेने त्या मातीत पाणी जिरवत रहाते. दिवस लोटतात, कधी महिने. मग ध्यानी मनी नसताना अचानक तो कोंब दिसतो. मातीचं छोटं छप्पर डोक्यावर घेऊन उभा असतो. मग एक नवा आनंदप्रवास सुरु होतो. त्या कोंबाचं रोपटं होतं. हसू-खेळू लागतं. फुलं येतात.”


 
माझ्या खिडकीतली रोपटी किती शांत असतात. रात्रभर पाऊस कोसळतो तेव्हा सकाळी ती झुकलेली, पावसाच्या माऱ्याने झोडपलेली दिसतात. मी त्यांच्याकडे पहाते. ती मला काहीच म्हणत नाहीत. ती तशीच असतात. उलट वारा आला की छान हलतात पानें. मला वाटलं तर मी त्यांना सावरते. नीट आधार देते. किंवा तसच ठेवते. ती काहीच म्हणत नाहीत यावर.

या झाडांचा मूकपणा मला सारखा जाणवतो. अरे काहीच कसं म्हणणं नसतं तुमचं? किती ही सहनशीलता?
सगळं कसं स्वीकारता तुम्ही शांतपणे? नाही कोणी पाणी दिलं, नाही जगता आलं तर आपली मरून जाता.
खरं तर मला वाटतं की खिडकीचा पडदा दूर होताच तुम्ही खूप बोललं पाहिजे माझ्याशी. सांगितलं पाहिजे मला की रात्री काय त्रास झाला. वाऱ्यामुळे फांद्या झुकल्या. किंवा ग्रीलवर आपटल्यामुळे लागलं वगैरे...पण तुम्ही काहीच सांगत नाही. माझ्यावर विश्वास ठेवता. मी समजून घेईन असं वाटतं तुम्हांला. नाही घेतलं तरी ते स्वीकारता तुम्ही. कमाल आहे तुमची.

“तुमची फुलं, पानं, तुमचा रंग मला सुख देतात. तुम्हांला वाढवण्यात आईपण मिळतं मला. तुम्हांला फुटलेले कोंब माझ्याही आयुष्यात आशा निर्माण करतात.”

तुम्ही फक्त देता. कसलीही अपेक्षा न करता.
शांतपणे! मग, कसं होता येणार मला झाड?