Thursday, September 4, 2014

आगंतुक!

अचानक एक दिवस माझ्या लक्षात आलं की माझ्या खिडकीत  मी न लावलेली अनेक झाडं आलीयेत. म्हणजे अक्षरशः बहरली आहेत. कसं काय? अर्थात याला वैज्ञानिक कारण आहे हे मला माहित आहे...शाळेत शिकलोय आपण ते....परागकण वाऱ्यामुळे उडून इतर ठिकाणी रुजतात  वगैरे...करेक्ट. पण मला असा विचार करायचा नाहीये. मला अर्थ लावायचा आहे .. किंवा शोधायचा आहे.

त्याला कारण आहे तसं.

मी सुद्धा  काही रोपं लावली होती. काही बिया आणि काही नाजूक रोपं. त्यांची खूप काळजी घेत होते मी. अगदी रोज उठून निगा राखत होते. अनेक महिने मी सतत बघत होते की बिया रुजतायत का? कोंब कधी फुटणार? पण मातीशिवाय काहीच दिसत नव्हतं. अगदी मनापासून हवं असलेलं एक रोपही लावलं होतं. गवती चहाचं. ते मोठं होईल आणि मग मी त्याचीच पानं घालून मस्तपैकी चहा पिईन असं ठरवलं होतं. ते उत्तम वाढण्यासाठी काही अटी होत्या. भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे. पाणी खूप जास्त घालायचं नाही इत्यादी. मी माझ्या परीने निगुतीने प्रयत्न केला. पण ते नाजूक रोप काही जगलं नाही. काही बिया रुजल्या नाहीत त्या नाहीतच. म्हटलं आपण काय बरं करणार? मातीच्या खाली जाऊन कसं बघणार की यांचं काय बिनसलं? 

कोणीतरी एका दुकानात सहज म्हणून दिलेली गोकर्णची वेल मी लावली होती. ती थोडी वाढली आणि मग सुकून गेली. का बरं? मग लक्षात आलं की काहीतरी कीड होती बहुदा त्यामुळे ती वाढू शकली नाही.
माझी बाकी काही रोपं मात्र छान वाढत होती. सदाफुलीला रोज एक फूल येत होतं. तुळस छान बहरत होती. मनीप्लांट पण उत्तम वाढत होतं. पण ही काही रोपं मात्र खूप काळजी घेऊनही आणि खूप आशा लावूनही रुजली नाहीत, वाढली नाहीत, बहरली नाहीत. ती गेलीच. सुकली. मग मुळापासून उपटून फेकून देण्यापलीकडे काही पर्याय नव्हता. तेच केलं. करावं लागलं. आता ती समोर नाहीत. त्यामुळे वाईट वाटत नाही. पण आपण जो वेळ दिला तो फुकट गेला असं कधी मधी वाटतंच. आणि वेळ म्हणजे नुसता वेळ नाही तर त्यातली मानसिक गुंतवणूक. असो. 

म्हणूनच जेव्हा हे आगंतुक पाहुणे खिडकीत बहरलेले दिसले तेव्हा वाटलं की हे कुठून आले? माझ्या नकळत  माझ्या दारात त्यांनी रुजण्याचं काय कारण आहे? एका वेगळ्याच कुंडीतून जेव्हा गोकर्ण उगवली आणि बहरली तेव्हा वाटलं की हिला नव्हती का गरज माझ्या लक्ष असण्याची? मी पाणी घालण्याची? किंवा सूर्यप्रकाश मिळावा म्हणून कुंडी हलवून ठेवण्याची? ही वेल कशी आणि का आपण होऊन इथे उगवली? आणि दिसते तर इतकी सुंदर की रोज सकाळी खूप हिरवागार, हलणाऱ्या पानांचा आनंद मिळतो. हे न मागितलेलं कसं काय मिळालं मला इतक्या सहज? मी काही न करता. माझ्या खिडकीभर पसरलेली ती वेल  पाहून मला खरंच रोज आश्चर्य वाटतं.....किती सुंदर वेल....स्वतःहूनच तिच्या इतक्या फांद्या पसरल्या आहेत. किती मस्त वाटतं मला जेव्हा मला ती रोज दिसते. मग मी बिया पेरल्या होत्या तेव्हा तू अशी येऊन का गेलीस? का नाही वाटलं तुला तेव्हा बहरावंसं?

मग मी आता काय समजायचं यातून? की सहज मिळालेलं घ्यावं आणि आनंदी व्हावं. की काही मिळावं म्हणून फार मागे लागू नये. मग ते मिळणार नाही कदाचित. की अती तेथे माती?
म्हणजे हवं ते मिळेल याची खात्री नाहीच. नको ते मिळू शकेल. पण मग ते मुळात हवं होतं का नाही याला काही अर्थ नाही. ते अचानक मिळालं म्हणून आनंदी व्हा. हं...असंच काहीतरी बहुदा. नाही अजून नीटसं कळलेलं मला. 

नकळत उगवलेली वेल मात्र मला रोज दिसत्ये. ती वाऱ्यावर छान डोलत्ये. भरपूर वाढत्ये. देव जाणे मला काय सांगत्ये. 

आणि मी अजिबात वाट बघत नाहीये त्यावर सुंदर फूल कधी उगवेल याची!!






Tuesday, July 29, 2014

बघू....!


खूप उकडत होतं. खूपच. पण सवय झाली होती तशी उकडून घेण्याची. घामाघूम होण्याची. होतेच नं आपल्याला सवय हळू हळू. सगळ्याचीच. आवडत नसतं अजिबात. पण इलाज नसतो. आवडत नसलं तरी चालवून घेतो आपण. उपाय शोधतो. काहिली कमी करण्याचे. दिवस तसेच घालवतो. आपलं आपलं काही नं काही करत. सूर्याचं रूथलेस तळपण सहन करतो आपण. नकळत मनात पावसाची आठवण येऊ लागते. तोच सोडवणार असतो आपल्याला या त्रासातून.

खूप वाट पहायला लावली त्याने. पण आला. उशीरा का होईना तो आला. छान बरसू लागला. उन्हाची झळ पाण्यात वाहून गेली. हे कसं बेस्ट आहे असं वाटू लागलं. थोडं पाणी साठणं, चिकचिक फारशी मनावर नाही घेतली. त्याचं येणं महत्वाचं होतं. आता त्यात कुठे आणि तक्रारी करत बसायचं. छान वाटत होतं.

मग तो खूपच कोसळायला लागला. कोसळतोच आहे. अरे बापरे! एकदम असं कसं? सततची छान हवा सुद्धा मानवत नाहीये. काय करायचं या सुंदर हवेचं? काहीजणांना आवडत नाहीये हे झाकोळलेलं आभाळ. त्यांना लख्ख उन हवंय. अरे? पण नको होतं नं आपल्याला हे उन काही दिवसांपूर्वी? डोळे वर करून बघताही येणार नाही इतकं जास्त उन दिलं होतं आपल्याला. नको होतं ते तसं. थोडं कमी चाललं असतं. आणि आता थोडं हवंय.

उन-पाऊस, पाऊस-उन. 
थोडं जास्त, थोडं कमी.
आत्ता आहे त्यापेक्षा थोडं अधिक.
नको.
आधी होतं ते बरं होतं.

आजचा दिवस चालवून घेऊ.
बघू, उदया कसं असेल ते.
नाहीतर परवा तरी हवं तसं मिळेलच.
बघू...
बघतच राहू.

रोज!

Saturday, January 11, 2014

जुनं आणि नवं...!




गेल्या वर्षाच्या शेवटी शेवटी मला इतकी नवी आणि जुनी माणसे भेटली. खरं तर अख्खं वर्षं मी काही एक-दोन  गोष्टी घडतील किंवा घडाव्यात अशी वाट पहाण्यात घालवलं. बाकी सगळं विसरून तेव्हढाच विचार करत होते. पण गंमत म्हणजे तेव्हढंच, हवं तेच फक्त घडलं नाही. पण नजर वेगळीकडे वळवली आणि लक्षात आलं की इतर खूप वेगळ्या, छान  गोष्टी घडल्या आणि मग मनाला आनंद वाटायला लागला. आनंद वाटून घेणं, मानण शेवटी आपल्याच हातात असतं की. लहानपणीच्या, शाळेतल्या जुन्या मैत्रिणी भेटल्या. त्या आपल्या आयुष्यातलं काहीतरी चांगलं घडलेलं इथे इंडियात साजरं करायला आल्या होत्या. माझ्या बहिणीच्या जुन्या ऑफिसमधल्या आणि वयाने थोडया मोठ्या मैत्रिणी भेटल्या आणि परत लहान झाल्यासारखं वाटलं. भाच्याच्या मुंजीच्या निमित्ताने मामेबहिण आणि बाकी नातेवाईक भेटले. अनेकांची लग्ने झाली आणि त्याचे आनंदसोहळे झाले. नवीन कामांमुळे नवी मंडळी भेटली, नवे ग्रुप्स झाले. खूप म्हणजे खूपच भेटी-गाठी झाल्या. आपल्या मनासारखं घडलं नाही की आपण खट्टू होतो. त्या परिस्थितीत आपण एकटे आहोत असं वाटतं कारण ते आपलं एकट्याचं हरणं असतं. आपल्यापुरतं मर्यादित. संपूर्ण जगाच्या तुलनेत ते नेहेमीच छोटूसं असतं. पण आपण केलं तर आपल्यासाठी खूप मोठं. मला असं एकटे आणि निराश वाटू नये म्हणूनच त्या अज्ञात शक्तीने इतकी सगळी आवडती माणसे मला भेटायला इकडून तिकडून, विविध निमित्तानी जवळ आणली असं मानायला मला फार आवडतंय. ते खरंच आहे. मनासारखं न घडलेलं मागे सारून मी हे वर्षं शांतपणे संपवलंय आणि नव्या वर्षांत अगदी सहज प्रवेश केलाय. “जे आहे ते आहे” हे स्वीकारायला मी शिकले की काय? अरे देवा! :-)
 
गेल्या वर्षांच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये मी नव्या गोष्टी आयुष्यात आणल्या, आपल्यातलं पोटेन्शियल जितकं वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल तितकं वापरण्यासाठी संधी निर्माण केल्या. त्यातूनच मी “छापा काटा” या मराठी नाटकाची फेसबुक पब्लिसिटी करण्याचं काम करायला घेतलं. पृथ्वीला हिंदी नाटके करताना आम्ही खूप वेगवेगळे व्हिडीयोज बनवायचो. पोस्टर्स रंगवायचो. जे काही क्रियेटीव्ह व्हायचं ते फेसबुकवरच्या आमच्या नाटकाच्या पेजवर जायचं. यातून सर्वांची क्रियेटीव्ह शक्ती तर कामाला यायचीच पण त्यामुळे नाटक खूप लोकांच्या नजरेला आलं. पाहिलं गेलं. हेच जर मराठी नाटकांसाठी केलं तर खूप फायदा होईल असं वाटलं कारण मराठी नाटकाला मुळात खूप प्रेक्षक असतोच पण त्यात तरुणांची भर घालायची असेल तर आजचं साधन म्हणजे सोशल मिडियाच आहे. ही आजच्या काळाची गरज मुक्ता बर्वे आणि दिनू पेडणेकर या निर्मात्यांनी ओळखली आणि या कामाला महत्त्व दिलं त्यासाठी त्यांचे आभार. छापा काटाचं फेसबुक पेज सजवण्यात आणि त्यासाठी एक केंपेन करण्याच्या निमित्ताने मी खूप शिकले. छोटे छोटे व्हिडीयोज शूट करून ते एडीट करायला शिकले. मला वाटतं की मराठी नाटकाचं असं पेज ज्यात व्हिडीयोजच्या माध्यमातून संवाद साधला गेलाय असं पहिल्यांदाच झालं असावं. टेक्नोलोजीमधे अप टू डेट राहणं हे फार महत्वाचं आहे हे नेहेमी वाटायचं आणि कळायचं पण ती खऱ्या अर्थाने शिकून तिचा उत्तम उपयोग करायला मी छापा काटामुळे शिकले. त्याचं खूप समाधान गेल्या वर्षाच्या शेवटी मिळालं आणि आजही मिळतंय. छापा काटाच पेज ३००० हून जास्त लोकांपर्यंत पोचलंय(लाईकस्).

गीतांजली कुलकर्णीबरोबर वाडा तालुक्यात तिथल्या तरुण मुला-मुलींसाठी 
सहाय्यकाच्या भूमिकेत राहून शिबीर घेतलं. तिथल्या मुलांची अभिनयाशी ओळख व्हावी हा मुख्य उद्देश असला तरी त्याचबरोबर त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी याचा किती उपयोग होतोय हे लक्षात आलं. गीतांजलीने यापूर्वीच सोनाळा गावातील छोटया मुलांना शाळा शिकवणाऱ्या तरुण मुला-मुलींवर खूप काम केलंय. यातले काहीजण या शिबिरातही होते. इतरांच्या तुलनेत त्यांना किती आत्मविश्वास आहे स्वतःबद्दल हे अगदी स्वच्छपणे दिसून आलं. माझ्या या मैत्रिणीचं खूप कौतुकही वाटलं. हा उपक्रम नव्या वर्षांत आम्ही सुरु ठेवणार आहोत. खूप नवीन कल्पनांवर काम करतोय. फेसबुक पेजदेखील करूच ज्यामुळे अनेकांपर्यंत हा उपक्रम पोहोचेल. तिथल्या मुलांचा नियमितपणे नाटक करणारा ग्रुप तयार होऊ शकला तर हा उपक्रम यशस्वी होईल पण नाहीच तरी त्या मुलांना एक वेगळा दृष्टीकोन मिळेल आयुष्याकडे पाहण्याचा हे नक्की.

लेखन हा माझा अत्यंत आवडीचा विषय. त्याही क्षेत्रात नव्या दिशेने छोटी छोटी पावले टाकायला गेल्याच वर्षाच्या शेवटी शेवटी सुरुवात केली. या छोटया पावलांनी मोठं अंतर पार केलं की आणि तरच त्याबद्दल लिहीन....कदाचित आणि होपफुली या वर्षाच्या शेवटी शेवटी!

एकूण नव्या वर्षाचा संकल्प वगैरे काही नाही. या वर्षी इतकंच ठरवलंय की प्रत्येक दिवस जगत, अनुभवत पुढे जाऊया, वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आघाडयांवर. त्यामुळे काय होईल की मनासारखं असं काही योजलेलं नसेल. त्यामुळे घडणारी प्रत्येक गोष्ट ही नवीच असेल. अपेक्षित नसेल त्यामुळे स्वीकारली जाईल किंवा विसरली जाईल. “नवे स्वप्न, नव्या आशा, नवीन सरप्राईजेस” या आणि अशासारख्या intangible शब्दांना आणि भावनांना या वर्षी माझ्याकडून काहीही मिळणार नाहीये. सॉरी, टाटा.

२०१४ कडून कुठलीही अपेक्षा न ठेवता, फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवत मी वाटचाल सुरुही केलीये. आणि खरंच फार छान वाटतंय....मोकळं मोकळं, निरभ्र आणि तजेलदार!