Sunday, November 24, 2013

प्लीज...



अरे हे काय चाललंय आपलं? आपण वाहन जबाबदारीने चालवणं का थांबवलंय?
कुठे पोचायचं असतं आपल्याला या अशा पद्धतीने गाडया आणि मोटार सायकली चालवून?
किती उदाहरणे देऊ लोक वेगवेगळ्या प्रकारे गाडी अत्यंत बेजबाबदार होऊन कशी चालवतात याची?

मोटार सायकलवाल्यांसाठी सिग्नल नसतात असं कुठे कोणी जाहीर केलंय का? म्हणजे असा काही कायदा मंजूर झालाय की काय? कारण लाल रंगाच्या सिग्नलला हल्ली बाईक्स चालवणारे अजिबात जुमानेनासे झाले आहेत. केव्हढी हिम्मत असते त्यांच्यात लाल सिग्नल बघूनही सरळ पुढे निघून जाताना. बरं, यात आपण कायदा पाळण्याची वगैरे फालतू सामाजिक जबाबदारी धुडकावून देतोय हा आविर्भाव (माज हा अधिक योग्य शब्द) असणारच पण तो कोणाला दाखवतोय आपण? हा माज दाखवताना, अत्यंत बेपर्वाईने आपल्या बाईक्स चालवताना आपल्याच जीवाला धोका आहे हे समजत नसेलच नं या मित्रांना? आपण घराबाहेर पडतो तेव्हा आई नेहेमी सांगते की नीट जा रे...हळू चालव बाईक. याला जगातलं कुठलंच घर अपवाद असू नये. पण मग या आईला काही कल्पना नसेलच नं असले बावळटासारखे प्रेमळ सल्ले देताना की आपलं बाळ आता खूप मोठं आणि जबाबदार (?) झालंय. त्याला आपण काही सांगून कळणार नाही. ते आपल्याला हवी तशीच बाईक चालवणार. सिग्नल धुडकावून, किंवा गाड्यांच्या डाव्या बाजूने सर्रास बाईक पळवत जाणारे, तारुण्याची नशा चढलेले, क्षणोक्षणी मृत्यूशी खेळणारे आणि आपल्यामुळे इतरांनाही खेळवणारे हे आपले बाळ पाहून या माउलीच्या काळजाचा ठोका चुकायचाच खरं तर. पण घरी बसून हे काही दिसत नसल्यामुळे एक तर “दृष्टीआड सृष्टी” असं म्हणणे किंवा पोरावर भाबडा विश्वास ठेवणे यापेक्षा फार काही करू शकणार नाहीच ती बिचारी.

हे झालं मोटार सायकलवाल्यांच. गाडी हाकणारे तसेच. एक तर नियम माहितीच नसणार किंवा सिग्नल तोडण्यासाठी असतात, गाड्या कुठेही पार्क केल्या तरी चालतात मग बाकीच्यांचा खोळंबा झाला, गैरसोय झाली तरी चालतंय ही बेफिकिरी. त्यात “एकाने गाय मारली तर मी वासरू का मारू नये” हा दृष्टीकोनही असतो. परवा लोणावळ्याहून एक्सप्रेस हायवेवरून येताना मधल्या स्लो लेनमधून जाऊ लागले तर अक्षरशः उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंनी वेगाने गाड्या पुढे जाऊ लागल्या. मी हबकून गेले. ओव्हरटेक उजवीकडून करायचं असतं हा ही नियम मोडीत निघालाय. शेवटी मी तिसऱ्या लेनचा आधार घेतला. इथे निदान डावीकडून वाहन वेगाने येणं तरी टळेल.

खरंच खूप संताप होतोय माझा. रोज गाडी चालवताना हे असं बेशिस्त ड्रायव्हिंग पाहिलं की वाटतं कधी झालं हे असं सगळं? इतकं बेधडक? छोटया लेनमधून मोठ्या मार्गावर येताना जरा थांबून अंदाज घेऊन यायचं हे भान नाही. सरळ आपलं भसकन मुख्य रस्त्याला लागायचं. मग मुख्य रस्त्यावर वेगात येणाऱ्या गाड्यांना कसं कळणार तुम्ही कुठच्या क्षणी घुसणार ते? 
बर, सिग्नलला (पोलीस दिसतायत म्हणून) थांबताना झेब्रा क्रॉसिंगच्या इतक्या पुढे गाडया नेतात की ज्यांना हिरवा सिग्नल मिळालाय त्यांनाही जायला जागा मिळू नये.
आजच शिवाजी पार्कजवळ एका नो एन्ट्री चा बोर्ड ढळढळीत दिसत असलेल्या गल्लीत एक महाकाय गाडी सरळ समोरून येणाऱ्या उलटया ट्राफिकला न जुमानता घुसली. कमाल वाटली मला. मस्तच चाललंय की सगळ्याचं. येणाऱ्या भविष्यकाळात भर रहदारीच्या रस्त्यात मधेच गाडी आहे तशी उभी करून आपली कामें करून येणारी माणसेही निर्माण होतील आणि आपणही या कुठेही उभ्या केलेल्या गाडयांना वळसे घालत पुढे जात राहू.

मनाची सुद्धा सोडल्यानंतर काय होणार दुसरं?

आज प्रत्येकाला खरं तर मनोमन हे माहित्ये की हे वागणं चुकीचं आहे, जीवावर बेतणारे आहे पण काही सुजाण नागरिक सोडले तर कोणी या बाबतीत सुधारायचं नावच घेत नाहीये. यात दोष कोणाचा वगैरे मुद्द्यांमध्ये शिरायचंच नाही मला कारण गाठ आपल्या जीवाशी आहे इतकं पुरेसं नाही का? परदेशात वाहन परवाना देताना कडक नियम असतात आणि सहजासहजी परवाना मिळतही नाही. आपल्या इथलं काय बोलावं? इथे किती गंभीरपणे आणि काय परीक्षा होतात सर्वांना माहित्ये.

कुठलाही नियम केला की मुळात आधी त्यातून पळवाट कशी काढायची हेच शोधण्याची मानसिकता झालेली आहे आपली. आपण जशी सार्वजनिक स्वच्छता पाळूच शकत नाही तसच कुठलेही नियमही पाळूच शकत नाही हे दुर्दैव नाही तर आपण स्वतःहून अंगिकारलेलं सामाजिक सत्य आहे. सगळं आपल्याच हातात आहे खरं तर पण आपण मनावर घेत नाही. 

काय करुया? जरा पुन्हा एकदा (किंवा बहुदा पहिल्यांदाच) सगळे नियम तरी नीट माहित करून घेऊया का? प्लीज? रोज रोज आपल्या आणि इतरांच्या जीवाशी नको खेळूया. कुठे पोचायला झाला थोडा उशीर तर चालेल पण सिग्नल पाळूया. ही जबाबदारी घेण्यात आता उशीर करून चालणार नाही.

Thursday, November 7, 2013

त्या तिघीजणी...



त्या तिघीजणी मला “मामी” फिल्म फेस्टिवलमधे भेटल्या.
साधारण एकाच वयोगटातल्या पण वेगवेगळ्या देशातल्या.

"वाजमा"
अफगाणिस्तानातल्या “वाजमा”ला सर्वात आधी भेटले. काबुल मधे राहणारी ही २० वर्षांची विद्यार्थिनी, आपल्या प्रियकराच्या प्रेमाला भुलून सामाजिक नीतिमत्तेचे काटेरी कुंपण कळत-नकळत ओलांडते आणि अर्थात त्यात ती रक्तबंबाळ होते ही तिची गोष्ट. मुस्ताफाच्या प्रेमात पडून, त्याला चोरून भेटत असताना आपण गरोदर असल्याचं तिला कळतं आणि मग तिची फरफट सुरु होते आपल्याच घरात. अफगाणिस्तानात या कृत्याला तुरुंगवास हीच शिक्षा किंवा सरळ कुठल्या तरी खेड्यात जाऊन मुलाला गुपचूप जन्म देऊन यायचं हा एक पर्याय. गर्भपात बेकायदेशीर असल्यामुळे तो उपाय अशक्यच. 
“तू माझा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा मातीत मिळवली आहेस” असं म्हणून तिचे समाजाला घाबरणारे वडील तिला अक्षरशः पायाखाली तुडवतात, मारून टाकीन म्हणतात. मुस्तफा तर कानावर हात ठेवतो. ही अशी कथा आपण अनेक वेळा हिंदी सिनेमांमध्ये पाहिलीये. परंतु जेव्हा ती काबुलमधे घडत असते तेव्हा तिथली कट्टर आणि बुरसटलेली सामाजिक व्यवस्था आजही या प्रश्नाला वेगळेच परिमाण देते. शेवटी वाजमाला भारतात गर्भपातासाठी एकटीलाच पाठवलं जातं. एयरपोर्टवर सर्वांचा निरोप घेताना वाजमाचा गळा भरून येतो आणि कसबसं आपलं रडू दाबत जाणाऱ्या सुंदर वाजमा या अफगाणी युवतीची अगतिकता अधोरेखित होते.

दुसऱ्या दोघीजणी फ्रेंच. अर्थातच मुक्त समाजातल्या. पण म्हणून त्यांच्यासमोर समस्या नाहीत असं नाहीच.
एमा आणि एडेल
१५ वर्षांची हायस्कूलमधे जाणारी एडेल ही एक आकर्षक, भोळी मुलगी भेटली ती “ब्लू इज द वार्मेस्ट कलर” मधे. वर्गातल्या मुलांचं अटेंशन मिळणाऱ्या एडेलला मात्र मुलाबरोबरच्या नात्यात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. काय ते कळण्याइतकी ती मोठीही नाहीये. तिचं भावविश्व तसं शाळा आणि घर यातच सीमित आहे. योगायोगाने तिला एमा नावाची युनिव्हर्सिटीत शिकणारी पेंटर मुलगी एका गे बारमधे भेटते. तिच्याशी काहीतरी कुठेतरी खटकन जमतं. भेटी-भेटींमधून एकमेकांबद्दल वाटलेलं मुळातले आकर्षण एका वेगळ्या शारीरिक पातळीवर जातं. आणि एडेलला वाटत असलेली कमतरता एमामुळे भरून निघते. समलैंगिक संबंधांमधे आनंद गवसलेली ही सुंदर एडेल पुढे त्याही नात्यातल्या असूया, असुरक्षितता यासारख्या नैसर्गिक भावना अनुभवते आणि समोर येईल तसं आयुष्याला तोंड देत जगत रहाते. मुक्त असणाऱ्या समाजातही एडेलला सुरुवातीला शाळेतल्या मैत्रिणींकडून अवहेलना सहन करावी लागतेच.



इसाबेल

तिसरी युवती भेटली ती “यंग एन्ड ब्युटीफुल” मधली इसाबेल. १७ वर्षांच्या इसाबेलला आपल्यात निर्माण होणाऱ्या स्त्रीसुलभ, नैसर्गिक लैंगिक भावनांबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण होतं आणि ते कुतूहल शमवण्यासाठी ती वेगवेगळे अनुभव घ्यायला सिद्ध होते. अगदी चार-चौघांसारखी सामान्य सुरक्षित कुटुंब असलेली ही इसाबेल स्वखुशीने हाय-प्रोफाइल प्रोस्टीट्युट बनते. त्यातून तिचं लैंगिक संबंधांविषयी असलेलं आकर्षण आणि उत्सुकता शमत नाही उलट वाढीला लागते आणि अगदी सहज पैसेही मिळू लागतात. घरच्यांपासून लपवून ती स्वतःची ही अशी वेगळ्या नावाने वेगळी ओळख निर्माण करते जी अर्थातच समाजाला उघडपणे मान्य नसलेल्या अशा व्यवसायात. शिवाय त्याबद्दल कुठलीही खंत किंवा गिल्ट नाही कारण जे स्वीकारलय ते स्वतःहून, मर्जीने. ती जे करत्ये ते तिला आवडतंय. त्यामुळे काम झालं की पैसे घ्यायचे. कोणी क्लायंट काही वावगं बोलला तरी त्यामुळे स्त्रीत्वाचा अपमान झाला वगैरे असलं काही नाही. पैसे घेऊन सरळ घरी. मग परत इंटरनेटवर आलेले मेसेजेस पाहून नव्या उत्साहाने पुन्हा तेच.




या वर्षीच्या मामीमधे खूप सिनेमे पाहिले. पण मनात घर करून राहिल्या या तिघी. यासाठी की या एकाच वयोगटातल्या मुली ज्या देशात रहात होत्या तिथल्या सामाजिक व्यवस्थेतल्या मुक्तपणा किंवा बुरसटलेपणामुळे त्यांना वेगवेगळ्या परिणामांना तोंड द्यावं लागलं. फ्रान्समधल्या एमा आणि एडेल जर वाजमाच्या काबुलमधे रहात असत्या तर? किंवा आपल्या भारतात असत्या तर? आपल्यातल्या या सुप्त आणि समाजात अस्वीकृत अशा उर्मीचं त्यांनी काय केलं असतं? गर्भपात करायला वाजमाला तिच्या वडिलांनी भारतात पाठवलं. ती परत येऊन पुन्हा आपलं आयुष्य सुरु करेल. पण याच पित्याच्या पोटी एडेल आली असती तर तिचा हा प्रश्न त्यांनी कसा सोडवला असता? कारण मुळात सोडवावा असा हा प्रश्न नाहीच. हे एक कटू वाटणारं पण तितक्याच समजूतदारपणे स्वीकारलं गेलं पाहिजे असं सत्य आहे. माणसांमधलं आणि म्हणून समाजामधलं. भारतात या दोघींचं काय झालं असतं? कदाचित काबुलमधे त्यांना मारून टाकलं असतं किंवा बहिष्कृत जीवन जगावं लागलं असतं. त्या मानाने भारतात त्यांना विचित्र आणि अब्नोर्मल म्हणून का होईना पण जगता नक्कीच आलं असतं.
आणि वाजमा जर पाश्चात्य देशात रहात असती तर तिची चूक ही चूक ठरली असती का?

आजपर्यंत भारतीय सिनेमांमध्ये बहुत करून ज्या “इसाबेल” होत्या त्या प्रत्येकीची काहीतरी एक कहाणी होती. परिस्थितीमुळे या व्यवसायात आलेल्या, आणल्या गेलेल्या, फसवल्या गेलेल्या, कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी आल्यामुळे इथे आलेल्या अशा मुलींच्या तुलनेत फ्रान्समधली इसाबेल अगदीच वेगळी. तिच्या या प्रोस्टीट्यूट होण्यामागे कुठलीही सोशिक कहाणी नाही. तिला ते आवडतं आणि कुठलही गिल्ट न बाळगता ती ते बिनबोभाट करते. आपण आपल्या आई-वडिलांच्या भावनांना दुखावतोय असं तिला नाही वाटत. कारण तिथेही कुटुंबव्यवस्था असली तरी तरुण झाल्यानंतर स्वतःच आयुष्य हे स्वतःला हवं तसं जगण्यासाठी इसाबेल रुथलेस बनते. ती नाही आई, वडील, भाऊ यांना काय वाटेल, ते कोलमडून जातील का असा विचार करत. काबुल मधल्या वाजमाच्या आणि फ्रान्समधल्याच एडेलपेक्षाही ती तडफदार आणि रोक-ठोक.

या तिघितली एडेल माझ्या मनात जरा जास्तच घर करून राहिलीये. तिचा प्रश्न हा तिने निर्माण केलेला नव्हता. तो निसर्गाने तिच्याकडे सोपवला होता. त्याचं अवडंबर न करता, आपल्या कुवतीप्रमाणे समजून घेत ती त्याला सामोरी गेली, न घाबरता...म्हणून ही एडेल अगदी अजूनही माझ्याबरोबर आहे. निष्पाप, साधी अगदी आपल्यातली. 

माझ्या आजूबाजूला अशी कोणी एडेल मला दिसली तर तिच्याकडे मी योग्य त्या आदरानेच बघितलं पाहिजे आणि तिला अगदी सहजपणे मी स्वीकारलं पाहिजे हे ही एडेल मला मूकपणे सांगून गेलीये.